लाच देणारा संस्थाचालक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सांगली - पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाची बनावट नोंदणी दाखवून अनुदान लाटणाऱ्या संस्था चालकाला सरकारी अधिकाऱ्यास १ लाख ९८ हजारांची लाच देताना रंगेहाथ पकडण्यात आले.  अजित उद्धव सूर्यवंशी (रा. पारे, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. पुणे व कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली

सांगली - पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाची बनावट नोंदणी दाखवून अनुदान लाटणाऱ्या संस्था चालकाला सरकारी अधिकाऱ्यास १ लाख ९८ हजारांची लाच देताना रंगेहाथ पकडण्यात आले.  अजित उद्धव सूर्यवंशी (रा. पारे, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. पुणे व कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुवर्णा पवार या सांगली येथे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील पारे या ठिकाणी राजवर्धन पाटील मुलांचे बालगृह ही संस्था असून, अजित सूर्यवंशी त्याचे अध्यक्ष आहेत. या संस्थेस पवार यांनी भेट दिली. बालगृहाच्या रेकॉर्डमध्ये ८८ मुलांची नोंदणी असताना प्रत्यक्ष तपासणीमध्ये सातच मुले आढळली. सूर्यवंशी यांनी खोटी मुले दाखवून शासनाकडून अनुदान लाटले, तसेच या वर्षीसाठीही ८८ मुले हजर असल्याची खोटी कागदपत्रे व माहिती पवार यांच्या कार्यालयास दिली. 

दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सुवर्णा पवार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याची खबर सूर्यवंशी यास मिळाली. हा नकारात्मक अहवाल पवार यांनी वरिष्ठ कार्यालयास पाठवू नये, यासाठी सूर्यवंशी याने त्यांना लाच देण्याचे प्रलोभन दाखविले. याप्रकरणी पवार यांनी दिवाण यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार आज १ लाख ९८ हजार रुपये लाच देताना सूर्यवंशी याला पथकाने रंगेहाथ पकडले. 

पहिलीच घटना
‘लाचलुचपत’च्या कारवाईत आजवर लाच घेणारा सरकारी अधिकारी जाळ्यात सापडला आहे; परंतु या घटनेत सक्षम महिला अधिकाऱ्यामुळे पहिल्यांदाच लाच देणारा जाळ्यात सापडला. सूर्यवंशी याच्या जिल्ह्यात विविध १९ शाळा आहेत. 

Web Title: Institutional operator arrested in Bribe case