सोलापूरकरांची आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वप्नपूर्ती 

अभय दिवाणजी
रविवार, 27 मे 2018

सोलापूर-हैदराबाद महामार्गाजवळ बोरामणी व तांदूळवाडी भागात 550 हेक्‍टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी भूसंपादन करण्यात आले. 2008 व 2012 अशा दोन टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया झाली.

सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु सत्ता बदलानंतर मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. श्री. शिंदे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले, तेव्हा त्यांनी सकारात्मकता दाखविल्याने सोलापूरकरांचे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पूर्ण होणे म्हणजे 'प्रभूं'चीच कृपा असे म्हणावे लागेल. 

सोलापूर-हैदराबाद महामार्गाजवळ बोरामणी व तांदूळवाडी भागात 550 हेक्‍टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी भूसंपादन करण्यात आले. 2008 व 2012 अशा दोन टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया झाली. होटगी रस्त्यालगतचे विमानतळ निकाली काढून तेथे आयटी पार्क उभारण्याची संकल्पना होती. यातून जो पैसा मिळेल त्याचा विनियोग बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी तसेच राज्यातील अन्य काही विमानतळाच्या विकासासाठी करायचा असा सरकारचा प्रयत्न होता. यात कुठे माशी शिंकली कोण जाणे? होटगी रस्त्यावरील विमानतळावरूनही विमानसेवा सुरू होत नाही, अन्‌ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचीही वीट काही उभारली जात नाही, असा काहीसा प्रकार गेले काही वर्षे सुरू आहे. होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यामध्ये सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीचा तांत्रिक मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. तरीही या विमानतळाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्ची टाकला गेलेला दिसतोय. 

सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी केंद्र सरकार सकारात्मक असेल तर राज्य सरकारने तातडीने काही पावले उचलण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. स्मार्ट सोलापूरच्या सर्वंकष विकासासाठी विमानतळाची उभारणी एक मैलाचा दगड ठरणारी आहे. 

सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणारच नसल्याचे ठासून सांगत खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सप्टेंबर 2017 पासून सुरू करण्याची घोषणा पासपोर्ट कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभावेळी राणा भीमदेवी थाटात केली होती. केंद्र सरकारने आता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी त्यांनीही हातभार लावावा, असे वाटते. 

केंद्र सरकारने सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासंदर्भात सकारात्मकता दाखविली आहे. या विमानतळ उभारणीचे प्रयत्न सुरूच आहेत. राज्य शासनाकडे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक, तथा उपाध्यक्ष, 
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण 

  • भूसंपादनासाठी मंगळवारी बैठक -

सोलापूर विमानतळाच्या विकासासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांनी मंगळवारी (ता. 29) मुंबईत मंत्रालयात भूसंपादन व इतर संदर्भात संबंधितांची बैठक ठेवली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: International airport will be soon in Solapur