
जागतिक संशोधनासाठी संधी
सांगली : इंटरनॅशनल सोसायटी फॉर ऑप्टिक्स अँड निक्स या अमेरिकन संस्थेने ‘ऑप्टिक्स’ या विषयावरील संशोधनासाठी जगभरातून २५ लोकांची निवड केली आहे. त्यात प्रीती जगदेव हिला संधी मिळाली. भारतातून ती एकमेव आहे. एन.आय.टी. गोवा येथे ती तरुण संशोधक म्हणून काम करीत आहे. गुरू परिवाराच्या सदस्या पद्मजा जगदेव आणि गोवा येथील महावीर जगदेव यांची ती कन्या आहे.
प्रीतीचे शिक्षण वास्कोतील सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट आणि एम.ई.एस. ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. तिने डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेन्टेशनमधून एमई झाली. जागतिक संशोधनासाठी एन.आय.टी. गोवा येथे प्रवेश घेतला. एनआयटीचे संचालक गोपाळ मुगेराया व संशोधन मार्गदर्शक डॉ. ललाट इंदूगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ती काम करते. गतवर्षी ब्राझील येथे संशोधन पेपर सादर केले. टोकिओ, अमेरिका व भारतातही तिने प्रभाव पाडला.
अमेरिकन संस्था एसपीआयई जगभरातील ऑप्टिक्स सायन्स, इंजिनिअरिंग, गणित क्षेत्रातील संशोधक महिलांची निवड करते. प्रीती सध्या गोव्यात ‘इन्फ्रारेड थर्मोग्राफी’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची आरोग्य नियंत्रणात उपयुक्तता’ विषयावर संशोधन करतेय. थर्मोग्राफी ही इन्फ्रारेड कॅमेराद्वारे केली जाणारी चाचणी असून, त्याद्वारे रक्तप्रवाह आणि शरीरातील उतीचा उपयोग यांचे नमुने तपासता येतात. याचा स्तनाच्या कर्करोग निदानासाठी सुद्धा उपयोग आहे. जगभरातील संशोधक इन्फ्रारेड कॅमेऱ्यावर काम करीत असून, त्याद्वारे कातडीच्या तापमानातील तफावतीची नोंद करणे शक्य आहे.
हेही वाचा- Khanchnale Memories: हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे नावाचं दोस्तीचं पानही प्रभावी -
राजमती भवनात भारतीय जैन संघटना आणि गुरू परिवारातर्फे माजी महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. भारतीय जैन संघटनेचे राज्य संचालक राजगोंडा पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, गुरू परिवारचे धन्यकुमार शेट्टी, सरोज शेट्टी, रावसाहेब माणकापुरे, संजीव उपाध्ये, व्ही. डी. वाजे उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे