टोमॅटोवर कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

किमान 15 रुपये किलो दर हवा 
एकरी सरासरी सात हजार रोपांची लागण करण्यात येते. एका रोपाला सरासरी २० किलो माल (टोमॅटो) निघतो. त्यामुळे एकरात साधारण दोन लाख किलो टोमॅटो निघतो. दर मिळाल्यास निश्‍चित शेतकऱ्यांना फायदा होतो. परंतु, अनेकदा घाऊक बाजारात किलोला एक रुपयाही दर मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावून त्यांच्या तोंडचे पाणी पळते. कमीत कमी १५ रुपये किलो दर मिळाल्यास शेतकऱ्यांना टोमॅटो पीक परवडते.

मलवडी - माणगंगा पुनरुज्जीवन, साखळी सिमेंट बंधारे व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना निसर्गाने दिलेली साथ यामुळे मलवडी परिसरात भर उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे. याच पाण्याच्या भरवशावर मलवडी, भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी, परकंदी या परिसरात सात ते आठ लाख टोमॅटो रोपांची लागण करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक या पिकावर केली आहे.

भांडवली, शिंदी खुर्द, गाडेवाडी ही गावे तरकारीसाठी प्रसिध्द आहेत. या गावांमध्ये नेहमीच कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर अशा फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवल्या जातात. यातून या गावांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. यंदा जलसंधारणाच्या चांगल्या कामांना पावसाने साथ दिल्याने मलवडी व परकंदीतही उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. काही शेतकरी कांदा, कलिंगड, काकडी, मेथी, कोथिंबीर लावत असले तरी बहुतांशी शेतकरी टोमॅटो पिकाकडे वळले आहेत.

बहुतांशी टोमॅटो लागवड झाली असली तरी अजून काही शेतकरी टोमॅटो लागवडीची तयारी करत आहेत. पाण्याची खात्री असली तरी टोमॅटो लागवड केलेल्या जवळपास ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बेड पध्दती, ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ठिबकच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी बचतीबाबत व त्यातून होणाऱ्या फायद्यांबाबत शेतकरी जागरूक झालेला दिसत आहे.

मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होऊन कोट्यवधींची गुंतवणूक शेतकऱ्यांनी केली असली तरी टोमॅटोला मिळणारा दर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना सुबत्ता प्राप्त होईल, अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

टोमॅटो लागवडीचा एकरी खर्च (फळधारणा होईपर्यंत)
 नांगरणी     २००० रुपये
 रोटर     १६०० रुपये
 शेणखत     १८८०० रुपये
 सरी पाडणे     १००० रुपये
 ठिबक सिंचन साहित्य     ३०००० रुपये
 टोमॅटो रोपे     ७७०० रुपये
 टोमॅटो लागण     ९०० रुपये
 काठी     १६४०० रुपये
 लोखंडी तार     १८०० रुपये
 सुतळी     १८०० रुपये
 टोमॅटो झाड बांधणी     २४००० रुपये
 भांगलण     ३६०० रुपये
 औषधे     ५००० रुपये
 एकूण खर्च     १,३०,८००

यात नंतर बांधणी, तोडणी, औषध फवारणी, खत घालणे, वाहतूक व इतर खर्च येतो. त्यामुळे सर्वसाधारण एकूण खर्च हा दोन लाखांच्या पुढे एका एकराला येतो.

Web Title: investment on tomato