तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

सोलापूर - तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही, तू आताच्या आता निघून जा... असे म्हणून पत्नीवर लोखंडी गजाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी पती तानाजी रावजी धायगुडे (वय 48, रा. तिल्हेहाळ. हल्ली- आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याच्यावर वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याची 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

पत्नी रंजना तानाजी धायगुडे (वय 45, रा. तिल्हेहाळ. हल्ली- आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी वळसंग पोलिसांत फिर्याद दिली आहे. तानाजी याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्नीला मारहाण केली. तानाजी हा शेतकरी असून त्याचा बैल विक्रीचा व्यवसाय आहे. धायगुडे पती-पत्नीला तीन मुली आणि एक मुलगा असून तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे. दोघेही आजी-आजोबा आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना या शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरासमोर अंगणात थांबल्या होत्या. पती तानाजी तिथे आला. तू फार म्हातारी दिसतेस, आता तू मला आवडत नाही, तू आताच्या आता निघून जा... तुला सांगितलेले कळत नाही का असे तो म्हणाला. तानाजी याने अंगणात पडलेला लोखंडी गज उचलून पत्नी रंजनाच्या दोन्ही पायावर, छातीवर मारहाण केली. मारहाणीत रंजना खाली पडली. तानाजी याने घरातून काथ्याची दोरी आणून तुला आज खल्लास करतो, असे म्हणून दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रंजनासोबतच तिच्या भावाला व भाचाला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या गुन्ह्यात तानाजी यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक इनायत काझी तपास करीत आहेत.

Web Title: Iron carnelian attack on wife solapur news