esakal | इस्लामपूर नगरपालिका : आघाडी करून निवडणूक लढण्याचे संकेत 
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Municipality: Indications to contest elections by taking the lead

इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुका वर्षावर आल्या असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी ही निवडणूक विकास आघाडी बनवून लढणार असल्याचे संकेत देतानाच नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यावरील रोष कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे.

इस्लामपूर नगरपालिका : आघाडी करून निवडणूक लढण्याचे संकेत 

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली ) : नगरपालिकेच्या निवडणुका वर्षावर आल्या असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी ही निवडणूक विकास आघाडी बनवून लढणार असल्याचे संकेत देतानाच नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यावरील रोष कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे. गत विधानसभेला मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची हवा झाली असताना श्री. पाटील-खोत यांच्यातील वादामुळे मंत्री श्री. पाटील यांनी एकहाती निवडणूक जिंकली. त्यातून आतातरी ही "आघाडी' काही बोध घेईल का? असा प्रश्न आहे.

आमदार श्री. खोत यांनी महाडिक गटासोबत विकास आघाडी करून पालिकेची निवडणूक लढवण्याची भाषा केलीय. ज्यांना निवडून दिले ते भेट घ्यायलाही तयार नाहीत. हा अप्रत्यक्ष टोला निशिकांत भोसले-पाटील यांनाच होता. नगराध्यक्ष श्री. पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचे. पक्षाने त्यांना संधी न दिल्याने ते विकास आघाडीत आले. त्यांनी चुणूक दाखवत यशही मिळवले.

भाजप, शिवसेना, रयत क्रांती, महाडिक गट, कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला आव्हान निर्माण केले. राष्ट्रवादीची सत्ता हातून जाईल, असेच चित्र असताना आमदार असणाऱ्या जयंत पाटील यांनी शर्थ पणाला लावली. तरीही राष्ट्रवादीला 14 जागा मिळाल्या. सत्तेचा लोलक विकास आघाडीकडे झुकला. शिवसेना सोबत असल्याने त्यांच्या पाच जागांसह आघाडीचे 13 नगरसेवक, नगराध्यक्ष असे 14 जण प्रथमच राष्ट्रवादीविरोधात पालिकेत आले.

चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जयंत पाटील मंत्री झाले आहेत. राज्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. नगराध्यक्ष, आमदार खोत यांचेही संबंध बरेच ताणलेत. इतके की नगराध्यक्ष पाटील यांनी विधानसभेला जयंत पाटील यांना आव्हान दिले. मात्र खोत यांनी शिवसेनेकडून गौरव नायकवडींना उमेदवारी मिळवून देत प्रचारही केला. त्याचा फायदा पाटील यांनाच झाला. 

आताही पालिकेच्या राजकारणात हीच भूमिका पुढे येताना दिसते आहे. राहुल महाडिक यांना युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन भाजपने ताकद दिली. त्याचा लाभ जरूर होईल. परंतु पुन्हा मागच्या विकास आघाडीची शकले होणार असतील तर ते प्रस्थापित राष्ट्रवादीच्याच फायद्याचे ठरेल. कारण ज्या शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत ती शिवसेना राज्यातील सत्तेच्या समीकरणाच्या जोरावर या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत राहण्याचीच शक्‍यता आहे. असे असताना जयंत पाटील यांना शह देण्यास आघाडी पूर्ण क्षमतेने एकत्र आल्यास आव्हान उभे राहील. 

दृष्टिक्षेपात बलाबल 

  • एकूण प्रभाग 14 
  • नगरसेवक 28 आणि थेट नगराध्यक्ष 1 
  • राष्ट्रवादी - 14 
  • विकास आघाडी - 13 आणि अपक्ष - 1 
  • नगराध्यक्ष - विकास आघाडी. 

संपादन : युवराज यादव

loading image