इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या प्रमुख दोन नेत्यांमध्ये जुंपली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत असणारे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
ncp
ncpsakal

इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील प्रमुख दोन नेत्यांमध्ये आज पुन्हा एकदा जुंपली. हे दोघे एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हमरीतुमरी व अंगावर धावून जाण्याची घटना घडली होती. आजही हे दोघे आमनेसामने आले. यानिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत असणारे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील गटनेते संजय कोरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक खंडेराव जाधव यांच्यात गेली काही दिवस अनबन सुरू आहे. दोघेही शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करतात. आज आझाद चौकातील एका मुस्लिम समाजाच्या कौटुंबिक विवाहसोहळ्याच्या निमित्ताने बस स्थानकालगत असणाऱ्या पुष्कर मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी हे नेते योगायोगाने आमने-सामने आले. मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांच्याजवळ त्यांचा संवाद सुरू होता. दरम्यान, खंडेराव जाधव यांनी पटवेकर व संजय कोरे यांच्याकडे पाहत ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ असा उच्चार केला. त्याला प्रतिक्रिया म्हणून ‘ये प्यार आयेगा भी, और जायेगा भी’ असे उत्तर संजय कोरे यांनी सुनावले. काही क्षणांच्या या संवादानंतर दोघेही आपापल्या मार्गाला लागले. खंडेराव जाधव यांनी कार्यालय सोडून बाहेर पडताच काही क्षणात संजय कोरे हेदेखील सभागृहाच्या बाहेर आले.

दरम्यान, पुन्हा एकदा हे दोघे आमने-सामने येताच त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यातून एकमेकांना बघाबघीची भाषा व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शहाजी पाटील यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. हा-हा म्हणता ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. या घटनेची संपूर्ण शहरात खुमासदार व चवीने चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपूर्वी, २ मार्चला ईदगाह मैदानाच्या कार्यक्रमावरून हेच दोघे मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या केबिनमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते.

जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या या दोन नेत्यांमधील संघर्ष हा चर्चेचा विषय बनला असून पक्षाच्या दृष्टीनेही अडचणीचा ठरणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी यात लक्ष घालून ते या दोघांचा वाद मिटवणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीची चर्चा होणे हे राष्ट्रवादीसाठी नकारात्मक ठरेल, हा नागरिकांमधील चर्चेचा सूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com