esakal | इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतराचा वाद पुन्हा पेटला 

बोलून बातमी शोधा

In Islampur, the vegetable market migration controversy flared up again}

गणेश भाजी मंडई स्थलांतराचा वाद आज पुन्हा पेटला. पालिका प्रशासनाने पोलिसांची मदत घेत रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव केला.

इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतराचा वाद पुन्हा पेटला 
sakal_logo
By
शंकर भोसले

इस्लामपूर :  गणेश भाजी मंडई स्थलांतराचा वाद आज पुन्हा पेटला. पालिका प्रशासनाने पोलिसांची मदत घेत रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव केला. शिराळा नाका परिसरात उभारलेल्या बाजार गाळ्यात विक्रेत्यांनी भाजी विक्री करावी, अशी सुचना दिली. मात्र, व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी पुर्वीच्याच जागेवर भाजी विक्री करण्याची भुमिका घेत माजी नगरसेवक कपील ओसवाल यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. शिवाय पालिकेच्या आवारात ठिय्या मारला. विक्रेत्यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन दिले. 

गणेश भाजी मंडई परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून सकाळच्या सत्रात भाजी मंडई भरते. गणेश मंदिरापासून दर्गा परिसरातील तळ्यापर्यंत तालुक्‍यातून आलेले शेतकरी व व्यापारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रीसाठी बसतात. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत हा बाजार भरलेला असतो. शहर व परिसरातील नागरिक भाजी खरेदीसाठी येथे येतात. बस स्थानकाकडे जाणारा आणि शहरातील हा मुख्य रस्ता असल्याने येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. 

सणासुदीच्या दिवशी मोठी वर्दळ असते. त्यामुळे पालिकेने या विक्रेत्यांना शिराळा नाका परिसरात उभारलेल्या बाजारगाळ्यात भाजी विक्रीसाठी बसण्याचे आवाहन केले. व्यापारी व भाजी विक्रेते मंडई स्थलांतरास विरोध करीत आहेत. यापुर्वीही मंडई स्थलांतरासाठी पालिकेकडून प्रयत्न झाले आहेत. त्यावेळीही विक्रेते व व्यापाऱ्यांनी याला विरोध केला होता. आज पालिका प्रशासनाने पोलिसांची मदत घेत गणेश मंडई परिसरात विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव केला. या परिसरात बॅरेकेड्‌स लावत विक्रेत्यांना शिराळा नाका परिसरात जाण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

अन्यत्र मंडईसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे पालिकेने आहे त्याच जागेवर परवानगी द्यावी अशी विक्रेत्यांची मागणी आहे. नवी जागा व तिथे सोयीसुविधा अपुऱ्या आहेत, स्थलांतराला स्थगिती द्यावी अशी भुमिका विक्रेत्यांनी मांडली. शाकीर तांबोळी, मन्सुर मोमीन, सोमनाथ फल्ले, उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार