शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन

शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) मानांकन मिळाले. ट्यू सूद साऊथ एशिया प्रा. लि. कंपनीने मूल्यांकन करून ‘आयएसओ ९००१: २०१५’ मानांकन दिले.  संपूर्ण विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील चौथे विद्यापीठ ठरले आहे. 

मानांकनामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यमापनात शिवाजी विद्यापीठाच्या गुणात वाढ होईल. हे मानांकन तीन वर्षांसाठी असून, प्रत्येक वर्षी कंपनीकडून विद्यापीठाचे मूल्यांकन होणार आहे. आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. 

मूल्यांकन प्रक्रियेची माहिती देताना आयक्‍यूएसीचे संचालक डॉ. आर. के. कामत म्हणाले, ‘या मूल्यांकनात प्रशासन, अभ्यासक्रमांची निर्मिती व रचना, अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपाययोजना आणि नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन आणि मूल्यमापन, परीक्षा कार्यपद्धती, निकालाची प्रक्रिया, विद्यापीठातील संशोधन या सर्व बाबींचे वर्षभर परीक्षण केल्यानंतर मग हे मानांकन दिले आहे.’ 

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘विद्यापीठाने दर्जावृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासूनच ही प्रक्रिया सुरू झाली, ती आजतागायत अव्याहतपणाने सुरू आहे. ही प्रक्रिया निरंतर असून, ती तशीच सुरू राहण्यासाठी आयएसओसारख्या बाह्य यंत्रणेची तिच्यावर नजर असणे महत्त्वाचे आहे.

आता या मानांकनामुळे एक टप्पा आपण गाठला आहे. इथून पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांवर आहे. त्या जाणिवेतून या पुढील काळात काम होत राहणे आवश्‍यक आहे. विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन संलग्नित महाविद्यालये सुद्धा आयएसओला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील.’ 

हे प्रमाणपत्र ९ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांसाठी असणार आहे. या कालावधीत कंपनी वर्षातून एकदा विद्यापीठाचे मूल्यांकन करेल. 

पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, अजित थिटे, कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहायक व्यवस्थापक अनिल साळवी, शाखाधिकारी सुजित पाटील आदी उपस्थित होते.

३७ अंतर्गत लेखापाल 
कंपनीने शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक यांची परीक्षा घेऊन त्यांच्यातील ३७ जणांची निवड अंतर्गत लेखापाल (इंटर्नल ऑडिटर) म्हणून केली आहे. त्यांना प्रशिक्षण दिले असून, विद्यापीठाच्या कारभारावर हे ३७ जण लक्ष ठेवणार आहेत. 

आयएसओ मानांकनामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. विद्यापीठाची प्रगती ही सर्वांगीण दृष्टिकोनातून सुरू असल्याचे हे प्रमाणपत्रच आहे. या मानांकनाचा उपयोग ‘नॅक’बरोबरच अन्य मूल्यांकनावेळीदेखील होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाचे हे यश असून, भविष्यातही विद्यापीठाची वाटचाल उत्तुंगतेकडेच राहील. 
- प्रा. डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com