‘इस्रो’च्या रॉकेटचे उड्डाण उद्यमनगरातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली आहे. तांत्रिक देखाव्यांत हातखंडा असलेले जय शिवराय मित्रमंडळ रॉकेट उड्डाणाचा हुबेहूब देखावा गणेशोत्सवात करणार आहे.

कोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली आहे. तांत्रिक देखाव्यांत हातखंडा असलेले जय शिवराय मित्रमंडळ रॉकेट उड्डाणाचा हुबेहूब देखावा गणेशोत्सवात करणार आहे. ३२ वर्षांत एकदाही गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यावर खड्डे मारलेले नाहीत, साऊंड सिस्टीम वाजवलेली नाही. तांत्रिक देखाव्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम हे मंडळ करत आहे. यंदाही त्यांनी वैज्ञानिक विषय निवडला आहे.

उद्योग पंढरी म्हणून राज्यभर शिवाजी उद्यमनगरचे नाव आहे. येथील कारागीर, तंत्रज्ञ, कलाकार जगात भारी आहेत. गणेशोत्सवात त्यांची कला तांत्रिक देखाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळते. यंदा येथील जय शिवराय मित्रमंडळाने इस्रोने तयार केलेले रॉकेट तयार करण्याचे काम सुरू केले. फडतरे मिसळशेजारी असलेल्या मंडळात तब्बल २० बाय १० फूट आकारात स्पेस स्टेशन रडार, सिस्टीम तयार करण्यात येत आहे. याच स्पेस स्टेशन मधून हे रॉकेट तब्बल २५ फूट उंच उडणार आहे. विशेष म्हणजे स्पेस स्टेशनचा सर्व कार्यभार वैज्ञानिक रूपात असलेले बाप्पा सांभाळणार असल्याचे दाखविले जाणार आहे.

तसेच आजपर्यंत इस्रोने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती येथे चित्ररूपातून दाखविली जाणार आहे. प्रशांत जाधव, सागर जाधव, रवींद्र सुतार, प्रताप देसाई, संजय साळोखे, नीलेश देसाई हे स्वतःचा फॅब्रिकेशन, इलेक्‍ट्रिकचा व्यवसाय सांभाळून सर्व साकारत आहेत.

रस्त्यावर एकही खड्डा नाही
प्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जय शिवराय मित्रमंडळाकडून गणेशोत्सव साजरा होतो. सर्जिकल स्ट्राईक, सेव्ह द टायगर, ट्रॅक्‍टर चालवणारा शेतकरी गणपती, असे देखावे त्यांनी सादर केले. कोणतीही सिस्टीम न वापरता पालखीतून ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीचे स्वागत होते.

पन्नासहून अधिक पारितोषिके
लोकवर्गणीतून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, खेळणी दिली जातात. पर्यावरणपूरक फायबरची मूर्ती तयार केली जाते. दरवर्षी दहा रोपे लावून ती जागवली जातात. मंडळाने स्वतःचे फेसबुक पेज तयार केले आहे. पन्नासहून अधिक पारितोषिके मिळवली असल्याचे मंडळाचे पांडुरंग पाटील यांनी सांगितले.

Web Title: ISRO rocket flight entrepreneurship