आजरा साखर कारखाना चालवण्यासाठी देण्याचा ठराव मंजूर 

आजरा साखर कारखाना चालवण्यासाठी देण्याचा ठराव मंजूर 

आजरा - आजरा साखर कारखाना चालवण्यासाठी देण्याचा ठराव आज विशेष साधारण सभेत बहुमताने मंजूर झाला. याला सर्वांनी मान्यता दिली. शेतकऱ्यांची थकीत देणी, कारखान्याला झालेला तोटा यावरून सभासद, संघटना प्रतिनिधी व संचालक यांच्यात शाब्दिक चकमकीचे प्रकार घडले. हे वगळता सभा शांततेत पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी भाषणात कारखान्याच्या आर्थिक परिस्थिती व तोट्याबाबत स्पष्ट भुमिका मांडली. 

आजरा कारखाना चालवण्यासाठी देण्याबाबत गवसे (ता. आजरा) येथील कारखाना कार्यस्थळावर विशेष साधारण सभा झाली. या सभेत कारखाना चालवण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्याचा ठराव मांडण्यात आला. तो बहुमताने मंजूर झाला. या वेळी सभेत मंजुरीचे फलक झळकले. 

कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी शिवप्रतिमेचे पुजन केले. प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले. श्री. चराटी म्हणाले, ""सरकारच्या धोरणांमुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. साखर विक्री, व्याज, यासह विविध कारणांच्यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. कोटा पध्दत व साखरेची उचल नसल्याने दरमहिन्याला सव्वा कोटी व्याज वाढत आहे. साखरेचे दर घसरल्यामुळे आर्थिक कोंडी झाली. गेल्यावर्षी स्पर्धेमुळे 3000 रुपये प्रतिक्विंटल दर द्यावा लागला. 2442 रुपये एफआरपी असताना पाचशे रुपये अधिक द्यावे लागले. त्यामुळे 19 कोटीचा तोटा झाला. 60 कोटीचा तोटा झाल्याने संचित तोट्यात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांच्या देण्यांबाबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आहे. बॅंकेकडून पैसे उपलब्ध करण्याचे प्रयत्न असून शेतकऱ्यांची देणी दिली जातील. सभासद साखरेसाठी 75 लाख रुपये उपलब्ध केले आहेत. यासाठी सव्वा कोटी रुपये बॅंकेत भरून सभासदांना साखर उपलब्ध करून दिली जाईल. कारखाना चालवण्यासाठी शेतकरी सभासद व कामगार प्रतिनिधींचा समिती नेमतांना विचार केला जाईल.''

दरम्यान, अध्यक्षपदाचा राजीनामा मागून प्रश्‍न सुटणार असले तर राजीनामा देण्याची माझी तयारी असल्याचेही अघ्यक्षांनी स्पष्ट केले. संभाजी पाटील, पांडुंरंग लोंढे, सुनिल शिंदे, अनिरुध्द रेडेकर, शांताराम पाटील, हरीभाऊ कांबळे, सुरेश दोरुगडे, सदाशिव जाधव, निवृत्ती कांबळे, युवराज पोवार, तुळसाप्पा पोवार, नारायण भडांगे, धिरज देसाई यांच्यासह सभासदांनी सुचना मांडल्या.

शेतकऱ्यांची मागील देणी देण्याची सभासदांनी मागणी केली. माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उदयराज पवार यांच्यासह आजी माजी संचालक व विविध संस्थाचे व संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सभासद, कामगारांना विश्‍वासात घ्या 
श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक संपत देसाई म्हणाले, ""कारखाना चालवण्यासाठी देताना सभासद, कामगार प्रतिनिधींना विश्‍वास घ्यावे. तो खासगी कंपनीकडे न देता सहयोगी तत्वावर द्यावा. शेतकरी, सभासद व कामगारांचे हित बघावे. त्यांची मागील देणी देण्यासाठी करारामध्ये निश्‍चित करावे.'' 
 
विरोधी संचालकांवरील टिप्पणीमुळे गोंधळ 
पांडुरंग लोंढे यांनी कारखाना तुम्ही चालवून दाखवा, असे म्हणत विरोधी संचालकांवर टिप्पणी केली. यावरून विरोधी संचालक वसंतराव धुरे, सुधीर देसाई यांचा लोंढे यांच्याबरोबर शाब्दिक वाद सुरु झाला. यामुळे सभेत गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर सभा पुन्हा सुरु झाली. 

कार्यकारी संचालक, सेक्रेटरी पदे भरण्याची मागणी 
कारखाना चालवण्यासाठी देताना कार्यकारी संचालक, सेक्रेटरी व शेती अधिकारी यांची पदे भरावीत, अशी मागणी संचालक प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केली. याला संपत देसाई यांनी दुजोरा दिला. 

प्रशासक नेमण्याची मागणी 
शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी कारखाना सत्ताधाऱ्यांच्यामुळे अडचणीत आल्याचा आरोप करून संचालक मंडळ बरखास्त करा व प्रशासक नेमा, अशी मागणी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com