विट्यातील बैल बाजार संपुष्‍टात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

सध्याचे दूध दराचे धोरण अनुकूल नाही. त्यामुळे दुधाला दर मिळेना. सततच्या दुष्काळामुळे लोकांनी म्हशी पाळणे बंद केले आहे. आधुनिकतेमुळे बैल बाजारही संपुष्टात आला आहे. बाजार समितीत सध्या शेळ्या - मेंढ्या व बोकडाचा बाजार तेजीत आहे. आठवड्याला त्याची सहा लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. 
- चंद्रकांत चव्हाण
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा.

विटा - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी भरणारा बैलांचा बाजार संपुष्टात आला आहे. बैलांच्या शर्यतींवर असणारी बंदी व यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. चारा, पाणी टंचाईमुळे दुभत्या म्हशींच्या खरेदी - विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारात एक  ते दोन म्हशींची खरेदी - विक्री होत आहे. 

खानापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. सध्या खानापूर घाटमाथ्यावर पाणी, चारा टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी पशुधन शेतकरी विकू लागले आहेत. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत चार वर्षांपूर्वी बैलांचा मोठा बाजार भरत होता. 

बैलांची मोठी उलाढाल होत होती. सांगोला, आटपाडी, मिरज व मंगळवेढा येथून व्यापारी बैल खरेदीसाठी येत होती. शर्यतींसाठी लागणाऱ्या बैलांची दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत सौदा व्हायचा; परंतु राज्य शासनाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातली. त्यामुळे त्यांची खरेदी - विक्री थंडावली. आधुनिकतेमुळे यंत्राद्वारे शेतीची कामे होऊ लागली. त्यामुळे बैलांचा वापर थांबला.  

शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी म्हैस पालन सुरू केले. परंतु सध्या दुधालाही दर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे म्हशीही पाळणे बंद झाले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील पशुधन कमी होऊ लागले आहे.  सध्या यात्रांचा हंगाम सुरु असल्याने पै-पाहुणे, मित्रांना जेवणावळी घालण्यासाठी बोकडांना चांगली मागणी वाढू लागली आहे. बाजार समितीत शेळ्या - मेंढ्यांबरोबर बोकडांचा बाजार मात्र तेजीत सुरू आहे.

सध्याचे दूध दराचे धोरण अनुकूल नाही. त्यामुळे दुधाला दर मिळेना. सततच्या दुष्काळामुळे लोकांनी म्हशी पाळणे बंद केले आहे. आधुनिकतेमुळे बैल बाजारही संपुष्टात आला आहे. बाजार समितीत सध्या शेळ्या - मेंढ्या व बोकडाचा बाजार तेजीत आहे. आठवड्याला त्याची सहा लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. 
- चंद्रकांत चव्हाण

सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा.

Web Title: issue of Bull market in VIta