कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणणे चुकीचे; उच्च न्यायालयात दाद मागणार

कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणणे चुकीचे; उच्च न्यायालयात दाद मागणार

कोल्हापूर -  कोल्हापुरी ही कोल्हापुरी चप्पलच असली पाहिजे. कर्नाटकात तयार होणाऱ्या चप्पलला कर्नाटकी चप्पल म्हणून मंजुरी द्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात - महाराष्ट्रातच तयार झालेली असली पाहिजे. महामंडळाच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणून मंजुरी दिल्यामुळे आम्ही जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहोत, असा इशारा चर्मोद्योग क्‍लस्टरचे संचालक आणि उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिला आहे.

जिओग्राफीकल इंडिकेशन याचा संबंध जागेशी असतो. तसेच त्याच्या उगमाशी असतो. त्याला धरून तो समुह वा कारगीर असतो. त्याला त्याचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असते. तो त्याचा अधिकारही असतो. कायद्याला सोडून नोंदणी चुकीची असेल तर तातडीने दुरूस्त करणे कारागीरींच्या हिताचे ठरेल. यासाठी त्यांनी संघटीत लढा उभारणे गरजेचे आहे.  

- गणेश हिंगमिरे

दरम्यान, महाराष्ट्रासह कर्नाटकात तयार झालेल्या कोल्हापुरी चप्पलला आता कोल्हापुरी चप्पल म्हणून ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. चेन्नई येथील रजिस्ट्रेशन जिऑग्राफिकल इंडिकेशन (जीआय) कडून मानांकन महाराष्ट्रातील संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाला मिळाले आहे. असेच मानांकन कर्नाटकातील बाबू जगजीवन लेदर इंडस्ट्रीजलासुद्धा मिळाले आहे. येथून पुढे महाराष्ट्र आणि कर्नाटकात तयार होणारी चप्पल ‘कोल्हापुरी चप्पल’ म्हणून ओळखली जाणार आहे. चपलांवर ‘एल’ आकाराचा ‘ऐरणी’चा लोगो असणार आहे. त्यासंदर्भातील बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे. कालांतराने येथील उद्योग कमी होऊन तो कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात विस्तारला. याचबरोबरीने कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, बागलकोट आणि विजापूर येथेसुद्धा कोल्हापुरी चप्पल तयार होऊ लागली. यामुळे मूळ चप्पल कोणती, याबाबत अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्‌भवतात. आजही कोल्हापुरात तयार होणारी ती कोल्हापूर चप्पल व इतर ठिकाणी तयार होणारी कोल्हापुरी बेळगावी चप्पल असे म्हटले जाते; मात्र अलीकडे कर्नाटकातीलही चप्पल कोल्हापुरी म्हणून मार्केटमध्ये विकली जात आहे. हा वाद कायम असतानाच महामंडळाला जीआय मानांकन मिळाल्याची बातमी धडकली आणि त्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.

मूळचे जे कोल्हापुरातील नाही, त्याला कोल्हापुरी का म्हणायचे, जीआयसाठी महाराष्ट्रातील चर्मोद्योग महामंडळाने याला सहमती देऊन प्रस्ताव सादर केला. याबाबत चर्मकार उद्योजकांत संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकातील चप्पल कोणत्याही स्थितीत कोल्हापुरी म्हणून मार्केटमध्ये येता कामा नये. त्याचा दर्जा कमी असल्यामुळे कोल्हापुरी चप्पलचे नाव बदनाम होते असेही उद्योजकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘जीआय’चे फायदे 
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चर्मोद्योग महामंडळांनी मिळून कोल्हापुरी चप्पलला जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव चार मे २००९ रोजी सादर केला होता. त्याला मंजुरी मिळालेले पत्र १८ जानेवारी २०१९ ला चेन्नई कार्यालयाने पाठवले आहे. ते अलीकडेच महामंडळाला मिळाले. आता लवकरच ‘एल’ आकाराचे ऐरणीचे चिन्ह प्रत्येक चप्पलवर असेल. चप्पल दर्जेदार असली पाहिजे. त्याच्या किमती ठरल्या पाहिजेत, चप्पलमध्ये कोणता कच्चा माल वापरला हे स्पष्ट करणारी माहिती ‘जीआय’मुळे दिली जाणार आहे. यासंदर्भात लवकरच चर्मोद्योग महामंडळाची बैठक होणार असल्याचे महामंडळाचे उत्पादन विभागाचे व्यवस्थापक एस. डी. भोगे (मुंबई) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com