‘नमामी कृष्णा’... नुसतीच घोषणा

‘नमामी कृष्णा’... नुसतीच घोषणा

सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या कृष्णा-वारणा संगमाच्या एका छायाचित्राने तर साऱ्याचा पंचनामा केला आहे. सांगलीकर गटारीचे पाणी नव्हे, तर विष पचवत आहेत.

कृष्णा नदीतील पाण्याचा रंग हिरवा भासायचा आता तो काळपट दिसू लागला आहे. उपग्रहाद्वारे टिपलेले  छायाचित्र वारणा नदीच्या पाण्याचा रंग आणि कृष्णेच्या पाण्याचा रंग यातील फरक स्पष्टपणे दर्शवणारे आहे. ही स्थिती केवळ हरिपूर संगमाजवळच नाही तर कृष्णा-कोयनेच्या संगमापर्यंत असेच चित्र पहायला मिळते. वारणा नदीचे पाणी तुलनेत स्वच्छ असल्याचे स्पष्ट होते. 

कोयना धरणातून सोडले जाणारे पाणी सध्या टेंभू, आरफळ उपसा सिंचन योजनेसाठी उपसले जात आहे. परिणामी कोयनेतून वेगाने पाणी येऊन कृष्णा वाहती झाल्याचे या हंगामात झालेच नाही. मध्यंतरी तर कृष्णा कोरडी पडली होती. साचलेल्या पाण्याला वास येतो, शिवाय पाणी आता काळसर दिसू लागले आहे. 

लढा ४५ वर्षांचा
सन १९७५ पासून हा लढा सुरू आहे. ‘डिस्कव्हरिंग कृष्णा’ मोहीम तेव्हापासून सुरू आहे. त्याकाळी मंत्र्यांना भेटून निवेदन दिली होती. महाबळेश्‍वर ते मछलीपट्टणम हा १२७० किलोमीटरचा प्रवास करून दोन महिने अभ्यास केला होता. त्यानंतरही अनेकदा अभ्यास सादर करण्यात आले. मात्र, काम काहीच झाले नाही. प्रभाताई कुलकर्णी, रवींद्र मराठे, श्रीकांत अभ्यंकर, गोविंद जोशी, डॉ. जी. आर. नाईक, जयपाल चौगुले, अजित ऊर्फ पापा पाटील यांच्यासह तेरा जणांची टीम राबत होती. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांना अहवाल दिला होता. 

कृष्णा नदीची ही अवस्था आपल्या कृतीमुळेच होते आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही या स्थितीचा आढावा घेत तिन्ही राज्यांना सादर केला होता. इतक्‍या काळात कृष्णा वाचवण्यासाठी काहीच काम झाले नाही. आता परिस्थिती बिकट झाली आहे. खूप काम करावे लागेल.
- पापा पाटील, 

‘डिस्कव्हरिंग कृष्णा’चे सदस्य

कारणांची जंत्री

  •   कृष्णाकाठच्या बहुतांश गावांचे सांडपाणी थेट नदीत. 
  •   साखर कारखान्यांसह उद्योगांचे पाणी प्रक्रियेशिवाय कृष्णेत. 
  •   कारखान्यांचे केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणारे प्लॅंट बंद.
  •   कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांच्या सहाय्याने होणारे मातीउपसा, वाळू उपसा. 
  •   रासायनिक खतांचा बेसुमार वापर. 
  •   पाणी वाहते नसल्याने सूर्यप्रकाशाद्वारे होणारे शुद्धीकरण प्रक्रिया थांबली.
  •   नदी स्वच्छ करणारे मासे नष्ट झाले अन्‌ जलपर्णी वाढली.

तेलंगणात आराखडा, कागदावरच
तेलंगण राज्यातील मंत्री व्ही. प्रकाश यांनी कृष्णा पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतला. समिती नेमली. महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी खासदार संजय पाटील यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले. त्यावरही काहीच काम झाले नाही. खासदार पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद आल्यानंतर कृष्णा प्रदूषणमुक्तीचा मास्टर प्लॅन जलआयोगाला सादर करणार असल्याचे सांगितले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com