कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यावर कंपनी सकारात्मक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एक बैठक होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार वेळा देण्यासाठी जीव्हीके आणि ट्रू जेट कंपनीने सकारात्मकता दर्शवली आहे. आज जीव्हीके, ट्रू जेट व विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक मुंबई येथे झाली. विमानसेवेचे दिवस तसेच वेळ निश्‍चित करण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एक बैठक होण्याची शक्‍यता आहे. बैठकीतच ‘ट्रू जेट’कडून विमानसेवा सुरू करण्याचा दिवस जाहीर केला जाऊ शकतो.

अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १६) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित घटकांची बैठक पार पडली होती. बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, तसेच विमान कंपनी व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. ‘ट्रू जेट’ कंपनीला मुंबई विमानतळावर सध्या उपलब्ध असलेल्या 
१६ स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय या बैठकीत झाला होता. तसेच आठवड्यातून पाच दिवस सेवा सुरू करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही होते.

मुंबई विमानतळावर आवश्‍यक स्लॉटची उपलब्धता आहे की नाही, तसेच त्याच्या वेळांची माहिती घेण्यासाठी आज संबंधित घटकांनी बैठक घेण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज जीव्हीके, ट्रु जेट व कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये जीव्हीकेने आठवड्यातून चार दिवस सेवा देण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. काल झालेल्या बैठकीत सकाळची वेळ द्यावी, अशी मागणी झाली होती. याविषयी ही बैठकीत चर्चा होऊन सकाळी १२ पर्यंत सेवा देण्याची तयारीही ट्रु जेटने दर्शवली आहे.

विमानसेवेचे निश्‍चित दिवस तसेच वेळ ठरवण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एक बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत विमानसेवेचा मार्ग मोकळा होऊन तारीखही जाहीर होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa air service