राजाराम महाराजांच्या नावाची केवळ घोषणाच

युवराज पाटील
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

शिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज  असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल उद्योजक, तसेच राजाराम महाराजप्रेमी जनतेतून होत आहे. 

शिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज  असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल उद्योजक, तसेच राजाराम महाराजप्रेमी जनतेतून होत आहे. 

कोल्हापूर संस्थानात दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापारवाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराजांनी रेल्वे सुरू करून दळणवळण सेवा वाढविली. तोच वारसा घेऊन छत्रपती राजाराम महाराजांनी विमानसेवेचा पाया रचला. १९३०-३५ ला विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७० एकर जमीन संपादित केली. विमानतळाचे उद्‌घाटन ४ मे १९४० ला छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले.

१९७८-७९ ला विमानतळाचे विस्तारीकरण झाले. उद्योगनगरी म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापूरला खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर नेण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील उद्योग, शेती क्षेत्राचा विकास साधता आला. राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे नाव रेल्वे स्थानकाला दिले, त्याच पद्धतीने विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव मिळावे म्हणून विविध संघटनांनी आंदोलन करून ही मागणी लावून धरली होती.

अनेक वर्षे त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू होता.
छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळास देण्याबाबत १७ डिसेंबर २०१७ रोजी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. १७ जानेवारी २०१८ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा ठराव झाला. यास सात महिन्यांचा कालावधी लोटला, दोन अधिवेशने झाली, तरी नामांतरणाबाबत कार्यवाही झाली नसल्याचे समजते.

एमआयडीसीकडे विमानतळाचा ताबा असताना परिसर स्वच्छ होता, मात्र आता विमानतळाचा ताबा भारतीय विमान प्राधिकरणाकडे गेल्यापासून दुरवस्था झाली आहे. २००३ ते २००८ ला कोल्हापूरची विमानसेवा सुरू होती. मग आता छोटे विमान का येते? अनेक विमान कंपन्या असताना एअर डेक्कनचाच आग्रह का धरला जातो?
- मोहन मुल्हेरकर,
उद्योजक.

विमानसेवा विस्कळीत असल्यामुळे औद्योगिक प्रगतीचा वेग मंदावला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानसेवा नियमित सुरू होणे गरजेचे आहे. कोल्हापूर विमानतळाऐवजी छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण त्वरित करावे.
- राजू पाटील,
अध्यक्ष स्मॅक.

Web Title: issue of Naming the Kolhapur Airport as Rajaram Maharaj