पंचगंगा प्रदूषणाची तीव्रता होणार कमी

डॅनियल काळे
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

नवी मुंबई, गोव्याच्या धर्तीवर प्रकल्प
शहरातील दुधाळी नाला हाही पंचंगगा नदी प्रदूषणास तितकाच जबाबदार होता. या नाल्यातील १७ एमएलडीवर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने २६ कोटी रुपये निधी दिला आहे. तसेच या प्रकल्पाची १३ वर्षे देखभालीची जबाबदारी घेण्याच्या अटीवर लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम पूर्ण केले आहे. ही कंपनी १३ वर्षे देखभाल करणार आहे. अशा प्रकारचा प्रक्रिया प्रकल्प नवी मुंबई आणि गोवा येथे आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प राबविला आहे.

कोल्हापूर - महापालिकेने २६ कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्यावर अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जात आहे. यासाठी दुधाळी नाला वळवून पूर्णपणे एसटीपीमध्ये घेतला आहे. त्यामुळे प्रक्रिया करून बाहेर पडणारे पाणी हे नदीत सोडण्याच्या योग्यतेचे बनले आहे. कसबा बावडा एसटीपी पाठोपाठ हा एसटीपीही कार्यान्वित झाल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीरच आहे. यामध्ये कोल्हापूर शहराचा वाटा हा ५० टक्के असल्याचे विविध पाहणी अहवालात स्पष्ट झाले होते. यासंदर्भात ‘निरी’ने केलेल्या सुचनेनुसार महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

मुळातच नदी प्रदूषणास जबाबदार असणारा सर्वात मोठा जयंती नाला हा कसबा बावडा एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्यात आला आहे. त्याचबरोबर बापट कॅम्प आणि रमणमळा नालाही या एसटीपीकडे वळविला जात आहे. एकूण ५६ एमएलडी पाण्यावर कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी नदीपात्रात सोडले जाते. हे काम हैदराबाद येथील एका कंपनीकडून केली जाते.

प्रक्रियानंतरच्या पाण्याला मागणी
दुधाळी नाल्यातील प्रक्रियेनंतरच्या पाण्याला या परिसरातील शेतकऱ्याकंडून मोठी मागणी आहे. परिसरातील ८० एकर शेतीला हे पाणी द्यावे, अशी मागणी संबंधित कंपनीकडे आली आहे; पण अद्याप या कंपनीकडून त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रक्रियेनंतर नदीपात्रात जाणारे पाणी हे नदीत सोडण्याच्या दर्जाचे आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदतच होणार आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता या दोन्ही प्रकल्पांमुळे कमी होणार आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असण्याचा एरवी बसणारा महापालिकेवरचा ठपका नजीकच्या काळात नाहीसा होईल.

नवी मुंबई, गोव्याच्या धर्तीवर प्रकल्प
शहरातील दुधाळी नाला हाही पंचंगगा नदी प्रदूषणास तितकाच जबाबदार होता. या नाल्यातील १७ एमएलडीवर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने २६ कोटी रुपये निधी दिला आहे. तसेच या प्रकल्पाची १३ वर्षे देखभालीची जबाबदारी घेण्याच्या अटीवर लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनीने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम पूर्ण केले आहे. ही कंपनी १३ वर्षे देखभाल करणार आहे. अशा प्रकारचा प्रक्रिया प्रकल्प नवी मुंबई आणि गोवा येथे आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प राबविला आहे.
 
Web Title: issue of Panchaganga River pollution