RiverPollution: पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी बारा नाले अडविण्यात येणार

RiverPollution: पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी बारा नाले अडविण्यात येणार

कोल्हापूर - पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी बारा नाले अडविण्यात येणार आहेत. त्या कामासाठी शेती विभाग, नो डेव्हलपमेंट झोन तसेच औद्योगिक विभाग बदलून तेथील जागा नाल्यावरील बंधाऱ्यांसाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिका नगररचना विभागाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. ही सभा शुक्रवारी (ता. १८) महापालिकेच्या शाहू सभागृहात होणार आहे.

दरम्यान, करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील दर्शन मंडपासाठीही जागा आरक्षणात बदल करण्याचे ठराव सभेपुढे मंजुरीसाठी आहेत. महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे.

सभेत सार्वजनिक वापरासाठीच्या आरक्षणात काही बदल करण्याचे प्रस्ताव आहेत. यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात यापूर्वी सी वॉर्ड सी.सी. नंबर४१२अ/३ या मिळकतीमधील आरक्षण क्रमांक ५५ अन्वये वाहनतळासाठी जागा आरक्षित होती. त्यात बदल करून ही जागा आता दर्शन मंडपासाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणारे नाले अडविण्यासाठी अमृत योजनेतून निधी मिळालेला आहे. या कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. बुधवारपेठ नाला, लक्षतीर्थ नाला, वीटभट्टी नाला आदी अडविण्यात येणार आहेत. या नाल्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविले जाणार आहे. ते पाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविले जाणार आहे. त्या बंधाऱ्यांसाठी शेती विभाग, औद्योगिक विभागाचे आरक्षण बदलून त्यासाठी बंधारे बांधण्याच्या वापरासाठी या जागा आरक्षित ठेवण्याचे प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवले आहेत.

बांधकाम परवाने पुन्हा विभागीय कार्यालयाकडेच?
दोनशे चौरस मीटरपर्यंतचे बांधकाम परवाने नगररचना विभागाकडून पुन्हा विभागीय कार्यालयांकडेच द्यावेत, अशी मागणी करणारा सदस्य ठराव नगरसेवक राजसिंह शेळके यांनी दिला आहे. नगररचना विभागाकडे कामाचा व्याप मोठा आहे. याउलट विभागीय कार्यालयांकडे कामेच नसल्याने ही कामे विभागीय कार्यालयांकडे द्यावीत, अशी मागणी या ठरावात आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com