#RankalaPollution परताळ्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात

#RankalaPollution परताळ्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात

कोल्हापूर - रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला प्रदूषण मात्र तलावाची काही साथ सोडत नसल्याचे चित्र आहे. परताळ्यातील कुजलेले पाणी थेट तलावात मिसळत असून, काळ्याकुट्ट पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली आहे.

रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या तीन नाल्यांतून सांडपाणी तलावात जात आहे. स्वच्छ पाण्यात कुजलेले पाणी मिसळत असल्याने रंकाळाप्रेमी, तसेच स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. परताळ्यात वर्षभर पाणी साचून राहते. वळवाचा पाऊस पडला तरी साचून राहिलेल्या पाण्याला तलावात वाट मिळते. अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही; मात्र वळवाच्या पावसाने परताळ्यातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली. वर्षभर दबून राहिलेले काळ्याकुट्ट पाण्याला वाट मिळाली आहे.

मुळात तीन नाले रंकाळ्याच्या दिशेने टाकण्याचे कामच चुकीचे झाले. कुजलेले पाणी पावसाळ्याच्या तोंडावर तलावात मिसळणार, हे ठाऊक असूनही नाल्यांचे बांधकाम झाले. प्रामुख्याने सकाळच्या वेळी पाण्याला वेग अधिक असतो. श्‍याम सोसायटीकडून येणारे सांडपाणी सुमारे साडेआठ कोटींची ड्रेनेजलाईन टाकून दुधाळीकडे वळविण्यात आले आहे. सरनाईक कॉलनीपासून मिसळणारे सांडपाणी रोखले गेले आहे. झाडे लावणे, गाळ काढणे व स्वच्छता या माध्यमातून रंकाळा संवर्धनाचे काम सुरू असताना रंकाळ्याच्या पाठीमागून कुजलेले पाणी तलावात जात आहे.

ब्लू ग्रीन अलगीचे संकट 
फेसाळलेले पाणी तलावात मिसळताना पाहून अंगावर काटा उभा राहत आहे. गेल्या वर्षीही हीच स्थिती होती; मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. सांडपाण्यामुळे रंकाळा तलाव गेली अनेक वर्षे प्रदूषणाच्या विळख्यात सापडला. दरवर्षी सप्टेबर, तसेच ऑक्‍टोबरमध्ये ब्लू ग्रीन अलगीचे संकट उभे राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com