सांगली भाजपमध्ये कशावरून सुरू आहे खदखद ?

Sangli News Issue in Sangli BJP Complain To State President
Sangli News Issue in Sangli BJP Complain To State President

सांगली - विधानसभा निवडणुकीत जत, शिराळा मतदार संघातील पराभव; सांगलीत काठावर आलेले यश आणि मिरजेत घटलेले मताधिक्‍य या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये खदखद सुरू झाली आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांच्याविषयीही काय तो निर्णय घ्या, अशी आक्रमक भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. 

जत विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेले माजी आमदार विलासराव जगताप यांनी धुसफूस उघडपणे मांडून त्याला वाट करून दिली आहे. जगताप यांनी आरोप केला आहे, की "लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांचे सर्व आमदारांनी प्रामाणिक काम केले. त्यांनी मात्र विश्‍वासघात केला. जतला त्यांच्या भूमिकेचा फटका बसला आणि पराभव झाला. संजयकाकांनी सांगलीत सुधीर गाडगीळ आणि मिरजेत सुरेश खाडे यांना पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.' 

जगताप यांच्या या आरोपानंतर भाजपमध्ये वातावरण तंग झाले आहे. दुसरीकडे तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचा तब्बल 62 हजार मतांनी मोठा पराभव झाला. तेथेही खासदार पाटील यांनी काम केले नाही, असा आरोप केला जात आहे. आकड्यांतूनही ते दिसत असून घोरपडे तीव्र नाराज आहेत. याबाबत शिवसेनेकडे काही कळवावे, अशी परिस्थिती नाही, तरी खासदार-सरकार यांच्यात काही काळासाठी झालेल्या एकीला पुन्हा तडे गेल्याचे सांगितले जात आहे. 

सांगली विधानसभा मतदार संघात माजी आमदार दिनकर पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही भाजपमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. इथे भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी झाले, मात्र अवघ्ये सात हजार मताधिक्‍य मिळाले. हे का घडले? सांगलीत पहायला मिळालेला "अंडरकरंट' कुणी सुरू केला, या मुद्द्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. तो मुद्दा सर्वप्रथम दिनकर पाटील यांनी उकरून काढला होता.

काँग्रेसने तो हळूवारपणे पुढे रेटला आणि त्याचा फायदाही झाला. दिनकर पाटील यांनी गाडगीळ यांना पाठिंबा दिला, मात्र त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या सांगलीवाडीने गाडगीळांना साथ दिली नाही. त्यामुळे दिनकरतात्यांना घेरण्याची संधी पक्षातील त्यांच्या विरोधकांनी आता साधली आहे. 

या सर्व घडामोडींची माहिती प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली आहे. भाजपची एक खास टीमसुद्धा या साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. त्यांचा सविस्तर अहवाल प्रदेशकडे जाणार आहे. त्याची सुरवात झाली आहे. आता याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे लक्ष असेल. 

चंद्रकातदादांचा इशारा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात पक्ष विरोधी काम केलेल्या नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे. पक्षाने विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना सोडले नाही, तुम्ही काय चीज आहात, अशा शब्दांत त्यांनी कान उपटले होते. त्यामुळे पक्षविरोधी भूमिकांची गंभीर दखल घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com