मनपाची चौकशी ; देशमुखांचे ढोंगच : वि. द. बर्वे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

"भाजपकडून लोकांना पर्स भेटवस्तू म्हणून दिली जातेय. देशमुख म्हणतात, एखाद्याच्या घरी गेलो तर भेटवस्तू देतो, ही रीत आहे. याआधी कधी का वाटल्या नाहीत भेटवस्तू. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लफडं काढलं आहे. खुळं करण्याचा प्रयत्न आहे. लोक खुळे नाहीत.'' 

सांगली : पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करतोय, असे सांगणे म्हणजे निव्वळ ढोंग आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते सरळ फसवत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी आज केला.  

 

ते म्हणाले,"देशमुखांचे वक्तव्य लोणकडी थाप आहे. मी चार वर्षे मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध थेट तक्रारी करतोय. तब्बल 22 वेळा पुरावे दिलेत. वसंतदादा शेतकरी बँकेतील ठेवींची वसुली, लेखापरीक्षण, ड्रेनेज, शेरीनाला याबाबतचे उच्च न्यायालयाचे निकाल त्यांना पाठवलेत. मुख्यमंत्री नगरविकासमंत्री आहेत. ते काही करायला तयार नाहीत. मग आताच चौकशीचा साक्षात्कार कसा झाला. ते काहीच करणार नाहीत. लोकांना फसवू नका. लोक सारखे फसणार नाहीत. ते पर्सच्या आतल्या गोष्टीची वाट पाहतील. मुळात देशमुखांवर एवढे आरोप आहेत ते काय चौकशी करणार?''  

ते म्हणाले,"भाजपकडून लोकांना पर्स भेटवस्तू म्हणून दिली जातेय. देशमुख म्हणतात, एखाद्याच्या घरी गेलो तर भेटवस्तू देतो, ही रीत आहे. याआधी कधी का वाटल्या नाहीत भेटवस्तू. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लफडं काढलं आहे. खुळं करण्याचा प्रयत्न आहे. लोक खुळे नाहीत.'' 

Web Title: On issues of Corporation Inquiry V D Barve Criticizes Subhash Deshmukh