"वसंत बंगला' हालू न देण्याचे या पक्षांचे आहे धोरण, वाचा काय आहे प्रकरण

 It is the policy of these parties not to allow "Vasant Bangla"
It is the policy of these parties not to allow "Vasant Bangla"

सांगली ः जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी अध्यक्षांच्या वसंत बंगल्यासह जलस्वराज्य विभागाची जागा आणि मिरज मार्केट यार्डमधील जागा विकसीत करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे. या जागा विकसित करण्याच्या नावाखाली त्याचा बाजारच होईल, अशी भिती व्यक्त करत तो हाणून पाडू, असा इशारा दिला आहे. वसंतदादांच्या नावाचा बंगला पाडण्यामागे वसंतदादांच्या नावाला विरोधाचे राजकारण आहे का, असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय चिघळणार आहे. 

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपने रिकाम्या जागांचा विकास आणि त्यातून स्वनिधी निर्माण करण्याचा विषय गेल्या दोन-तीन वर्षात चर्चेत आणला होता. त्याला पुढे चाल मिळाली नव्हती. प्राजक्ता कोरे अध्यक्ष झाल्यानंतर हा विषय अधिक ताकदीने रेटण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यात जिल्हा परिषदेसमोरील, सांगली मिरज रस्त्यालगतची जलस्वराज्य विभागाची मोक्‍याची जागा नेहमीच चर्चेत राहिली आहे. तेथे मोठा हॉल, बैठक कक्ष आदी करावे, असा प्रस्ताव उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी याआधी मांडला होता. त्यात अध्यक्षांच्या वसंत बंगल्याची भर पडली. तो बंगला दहा गुंठे जागेवर आहे. ती विश्रामबागमधील अतिशय मोक्‍याची जागा आहे. तेथे व्यापारी संकुल करून जागेचा बाजार मांडण्याचे धोरण आम्ही खपवून घेणार नाही, असे कॉंग्रेसचे ठाम मत आहे. राष्ट्रवादीकडून तूर्त जागा विकासाला विरोध नाही, मात्र त्याचा बाजार होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. हा विषय सभागृहात येण्याआधीच त्यावर राळ उठली आहे. 
माजी जि.प. उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुहास बाबर म्हणाले,

""वसंतदादांचे नाव असलेला बंगला पाडायला आमचा विरोध असेल. तिथे कसल्याही प्रकारचे कॉम्प्लेक्‍स होऊ देणार नाही. जिल्हा परिषदेच्या अन्य जागांचा विकास करायचा आहे तर नक्की करू. त्यातही बाजार मांडला जाईल, असे काहीही होणार नाही. जे योग्य असेल ते सर्वांच्या विचाराने केले पाहिजे.'' 

कॉंग्रेस नेते जितेंद्र पाटील म्हणाले, ""जागा विकसीत करायला निधी आहे का? घसारामधील निधी कसा काढणार ? त्यातून तीन ते चार कोटीवर रक्कम नसेल. त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. वसंतदादांचे नाव असलेल्या जागेवरच डोळा कशासाठी? वसंतदादांच्या नावाला यांचा विरोध आहे का ? कुपवाड, इस्लामपूर, विट्यातील जागा बघा. तेथे उत्पन्न मिळू शकेल. वसंत बंगला राहिलाच पाहिजे. कॉंग्रेस त्याला कडाडून विरोध करेल. त्याचा बाजार करू देणार नाही.'' 

राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषदेतील विरोध गटनेते शरद लाड म्हणाले,""आम्हाला विश्‍वासात न घेता हा विषय चर्चेला आणला कसा? जिल्ह्यातील मोक्‍याच्या जागा ताब्यात घ्या, विकसित करा, ही मागणी जुनी आहेच. केवळ वसंत बंगला आणि जलस्वराज्यची जागा कशासाठी? आष्टा, इस्लामपूरसह जिल्ह्यातील अन्य सर्व जागांकडे दुर्लक्ष कशासाठी? जागा विकसीत करायला विरोध नाही, उत्पन्न वाढले पाहिजे, मात्र जिल्हा परिषदेची मालकी ठेवूनच ते असायला हवे. त्याचा बाजार करायला कुणाचा डाव असेल तर तो चालून देणार नाही.'' 

घसारा निधी किती? 

जिल्हा परिषदेकडे एकूण नऊ कोटी रुपये घसारा निधी आहे. घसारा निधी साधारण पाच हेडखाली जमा केला जातो. इमारत बांधली, की त्याचे दरवर्षी व्हॅल्यूएशन करायचे आणि त्याचा प्रत्येक वर्षी काही निश्‍चित टक्‍क्‍यांने घसारा जमा केला जातो. शाळा, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने या साऱ्यांचा घसारा असतो. वाहन, इमारत, संगणक, फर्निचर आणि यंत्रसामुग्री असे साधारण हेड आहेत. हा निधी खर्च करताना राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागते. 

स्विय निधीला विरोध 

जिल्हा परिषद सदस्यांच्या स्विय निधीतून हे काम करता येईल, अशी चर्चा याआधी याच सत्ताकाळात झाली होती. कॉंग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी त्यावर चर्चा घडवून आणली होती. त्याला बहुतांश सदस्यांनी विरोध केला होता. स्विय निधी हा सदस्यांच्या हक्काचा असतो. दोन ते तीन वर्षांसाठी तो डावलण्याला कुणीच मान्यता दिली नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com