#Jaganelive चंदगडला हत्तींचा वावर बारमाहीच

#Jaganelive चंदगडला हत्तींचा वावर बारमाहीच

कर्नाटकातील हत्तींनी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करून आता दीड दशकाचा कालावधी उलटला. गवे, रानडुक्कर यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे हत्तीच्या रूपाने मोठे संकट उभे राहिले. हत्तीने महाराष्ट्रात प्रवेश केला, तोच मुळी एका महिलेचा जीव घेऊन! त्यानंतर कलिवडे येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा दुसरा बळी गेला. पुढे जेलुगडे येथे दलदलीत फसलेल्या चार हत्तींचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. पाटणे येथे विहिरीत पडून हत्तीणीचा करुण अंत झाला. दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्‍यात येणाऱ्या हत्तींकडून हातातोंडाशी आलेले पीक फस्त करण्याचे काम सुरूच होते. याच विषयावरून मोर्चे, आंदोलने झाली. हत्तींना आवर घालण्याचे अनेक उपाय चर्चेत आले. या चर्चा होत राहिल्या. हत्ती येत-जात राहिले. आता तर ते या भागात बारमाही स्थिरस्थावर होत आहेत.

सन २००३ मध्ये कर्नाटक हद्दीवरील होसूर येथे हत्तीचे आगमन झाले. शेतात काम करणाऱ्या लीला पाटील या विवाहितेला हत्तीने सोंडेत धरून आपटून मारले. परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही भरपाई कशा प्रकारे द्यायची, असा प्रश्‍न महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याला पडला. कारण तोपर्यंत महाराष्ट्रात हत्तीची नोंद नव्हती. हत्तीने नुकसान केल्यास त्याची भरपाई कशा पद्धतीने द्यायची, याची लेखी नोंद नसल्याने खात्याच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

कर्नाटकातील हत्ती तेथील वन विभागाने परत न्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र वन विभागाने केली. कर्नाटक जर हजारो हत्ती सांभाळत असेल तर महाराष्ट्र शासनाला एक हत्ती पोसता येत नाही काय, असे प्रत्युत्तर कर्नाटक वन विभागाने दिले. उन्हाळ्यात आलेला हत्ती पावसाळ्याच्या तोंडावर परत गेला. आता तो परत येणार नाही, अशी अटकळ पुढच्या चार महिन्यांत फोल ठरली. हत्तींचा कळपच भागात येऊन धुडगूस घालू लागला. हाताशी आलेले पीक उद्‌ध्वस्त होताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. हत्तीकडून पिकाचे नुकसान, जीवित हानी, तर सुमारे पाच हत्ती मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

एका बाजूला हत्ती म्हणजे संकट, तर दुसऱ्या बाजूला हत्ती हे गणेशाचे रूप म्हणून त्याची पूजा करण्याचे प्रकारही घडले. हत्तींच्या अध्यायातील हा सर्व ‘क्‍लायमॅक्‍स’ घडत असताना हत्तींना हटवण्यासाठी अनेक उपाययोजनांची चर्चा झाली. ती केवळ चर्चाच ठरली. होसूर ते चंदगड आणि पुढे आजरा, भुदरगड ते पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश हत्तीने काबीज केला. खाली तळकोकणातही ते उतरले. 

हत्तींसाठी सुरक्षा चर खोदाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. विविध उपाययोजना सुचवल्या. तिलारीनगर परिसरात हत्तींसाठी अभयारण्य करण्याबाबत चर्चा झाली. मोर्चे, आंदोलनातून हत्तीच्या प्रश्‍नावर उपाय योजण्याची मागणी झाली. बाजारभावाप्रमाणे भरपाई देण्याची मागणी झाली; परंतु अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. अलीकडच्या काळात तर शेतकरी हत्तीला सरावल्याचे चित्र दिसते. सहयोजी सहजीवनाचा हा प्रयोग सिद्ध होताना दिसत आहे; परंतु भरपाईचा प्रश्‍न भिजत घोंगडे पडला आहे.

जंगलालगतची शेती कसणे दिले सोडून
गवे, रानडुक्करांपासून पिकांची रखवाली करता येत होती; परंतु हत्तीचे संकट जीव घेणे असल्याने शेतकऱ्यांनी रखवाली बंद केली. त्याचा फायदा गवे, रानडुक्करांना झाला. यामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी जंगलालगतची शेती कसणे सोडून दिले आहे. पंधरा वर्षांत मोठ्या प्रमाणात शेती पड पडत आहे. 

हत्तींकडून होणारे नुकसान हे अन्य प्राण्यांपेक्षा अधिक आहे. पिकातून त्याला हुसकावणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. हत्तीकडून होणारा हल्ला जीवघेणा आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या संकटातून शेतकऱ्याला वाचवायचे असेल तर पिकाची बाजारभावानुसार भरपाई देणे गरजेचे आहे.
- विवेक पाटील,
शेतकरी हेरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com