#Jaganelive धागा धागा गुंफून ‘त्या’ विणती संसाराचे शेले!

#Jaganelive धागा धागा गुंफून ‘त्या’ विणती संसाराचे शेले!

अन्न, पाणी आणि वस्त्र या आपल्या मूलभूत गरजा. त्यापैकी अंगावर असलेलं वस्त्र येतं कुठून, ते तयार कसं होतं, याचा फारसा विचार आपण करत नाही. ही वस्त्रं विणणारे हात आहेत, महिलांचे. इचलकरंजी या वस्त्रनगरीत हे हात धागा धागा अखंड विणत असतात. रंगबिरंगी वस्त्रांतून इतरांचं आयुष्य सप्तरंगी बनवणाऱ्या या महिला कामगारांचा दिवस उगवतो आणि मावळतो तो एकाच रंगात. तो रंग आहे कष्टाचा, संघर्षाचा. महाराष्ट्राची मॅंचेस्टर नगरी अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरातील तब्बल १० हजारांहून अधिक महिलांनी कपडे तयार करण्याच्या उद्योगात स्वत:ला विणून घेतलं आहे.  

यंत्रमागाची चक्रे फिरली तरच इचलकरंजीतील ७० ते ८० हजार कामगारांचे जीवनमान चालते. चक्र अडकले की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. कामगार नवऱ्याच्या मजुरीत भागत नाही म्हणून या उद्योगात घरातील स्त्री उतरते. आणि कुटुंबाचा आर्थिक भार उचलते. इचलकरंजीतील कापडाने आज देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. यामागे येथील कामगार महिलांचे कष्ट आहेत. 

येथील वस्त्रोद्योगात कापसापासून सूत तयार होणाऱ्या सूतगिरणी उद्योगापासून ते संपूर्ण तयार कापड झाल्यानंतर त्यापासून वस्त्र तयार करण्याच्या उद्योगापर्यंत येथील महिलांचे योगदान आहे. सूतगिरणी, प्रोसेस, यंत्रमाग, गारमेंट या क्षेत्रात महिला काम करतात. शहरातील वस्त्रोद्योग २४ तास सुरू असतो. त्यामुळे दिवसभराच्या कामात रात्रभर लागणाऱ्या अनेक कामांची पूर्तता या महिलांना करावी लागते. यंत्रमागाला कांडी भरण्याचे काम सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत या महिलांना करावे लागते. 

सुताचे धागे वहिफणीमध्ये विणण्यासाठी या महिलांना नजर स्थिर ठेवावी लागते. सूतगिरणीत कापसापासून सूत तयार होताना त्यामध्ये एक धाग्याची त्रुट राहू नये, यासाठी या महिला डोळ्यात अंजन घालून काम करतात. सकाळी पाच वाजता उठून घरातील स्वयंपाक आणि अन्य कामे आवरायची, आठ वाजता घरातून बाहेर पडून नऊपर्यंत कारखान्यापर्यंत पोचायचे, संध्याकाळी सहानंतर कामाच्या वेळेनुसार बाहेर पडून पुन्हा रात्री सात वाजेपर्यंत घरामध्ये पोचायचे आणि घरातील कामे आवरून रात्री अकरापर्यंत अविश्रांतपणे काम करायचे, ही या व्यवसायातील महिलांची दैनंदिनी.

अनेक महिलांना परिस्थितीमुळे या व्यवसायात काम करावं लागतं. आवाजाचा खडखडाट, सुताचे तंतू, दमट हवामान हे सगळं सहन करीत महिला या व्यवसायात काम करतात. मात्र, हे करण्याशिवाय पर्यायच नसल्यामुळे शहरातील उद्योगात अनेक महिलांचं योगदान दिसतं.
- वंदना चव्हाण,
यंत्रमाग कामगार

पगारासाठी संघर्ष...
शहरात राहण्यासाठी जागाच नसल्यामुळे इचलकरंजीपासून १० ते १५ किलोमीटर परिसरात असणाऱ्या अनेक महिलांना प्रवासातही संघर्षही करावा लागतो. उत्पादनावर आधारित किंवा कामाच्या प्रमाणात पगार मिळत असल्यामुळे अधिकाधिक काम करून जास्तीत जास्त पगार पाडण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com