माथाडी कामगारांच्या काम बंदचा फटका गुळ सौद्यास 

शिवाजी यादव
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

अन्यथा परवाने रद्दची कारवाई 
"" गुळाचे सौदे सुरू असताना अचानकपणे काम बंद आंदोलन करून गुळ सौदे बंद पाडणाऱ्या माथाडी कामगारांचे परवाने रद्द करण्याची कारवाई बाजार समिती तर्फे करण्यात येणार आहे.''

- मोहन सालपे, सचिव  

कोल्हापूर - माथाडी कामगारांनी जादा वेळ काम करण्यास नकार दिल्याने शाहू मार्केट यार्डातील गुळ सौदे पून्हा बंद पडले त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारण काढून सौदे बंद पाडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी दिला. तसेच शाहू मार्केट यार्डात गुळ आवक जावक 24 तास सुरू ठेवावी,  अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. 

यंदाचा गुळ हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे, त्यामुळे शाहू मार्केट यार्डातील गुळ बाजारपेठेत गुळाची आवक मोठ्या प्रमाण झाली आहे. सौदेही सुरळीत सुरू होते, मात्र काल बुधवारी सहा व्यापाऱ्यांकडे माथाडी कामगारांनी दुपारनंतर काम करण्यास नकार दिला. त्यामुळे गुळ रवे पडून राहीले. तिथे सौदे घेता येणे मुश्‍कील झाले. यावरून अडते, व्यापारी, माथाडी कामगार यांच्यात वादाला सुरवात झाली. तेव्हा सर्व दुकानातील माथाडी कामगार सौदे काढले नाहीत. परिणामी आवक जैसे थे राहीली त्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या गुळचे सौदे काढा असा आग्रह धरला. 

यानंतर आज गुरूवारी सकाळी गुळ सौदे सुरू झाले मात्र काही वेळात पून्हा वेळे वरून वाद सुरू झाला. माथाडी कामगारांनी काम बंद केले. सर्व माथाडी सौदे स्थळावरून माथाडी कामगार युनियनच्या कार्यालयकडे गेले. तेथेच ते थांबून राहीले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सर्वांनी बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांची भेट घेऊन माथाडी कामगारांच्या कामाच्या वेळा निश्‍चित कराव्यात, तसेच आलेले गुळ रवे आवक उतरूण घेणे व सौदे झाल्यानंतर गुळ उचलणे ही कामे माथाडी कामगारांकडून वेळेत करून घ्यावीत, यार्डात 24 तास गुळाची आवक जावक सुरू ठेवावी, अशा मागणीचे निवेदन दिले. 

या निवेदनावर बाजार समिती सभापती व संचालक मंडळासमोर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच माथाडीनी अचानकपणे काम बंद आंदोलन करू नये अशा सुचना श्री. सालपे यांनीही दिल्या मात्र माथाडी कामगारांनी काहीही ऐकूण न घेता काम बंद आंदोलन केले त्यानंतर सकाळी साडे दहानंतर गुळाचे सौदे होऊ शकले नाहीत. 

अन्यथा परवाने रद्दची कारवाई 
"" गुळाचे सौदे सुरू असताना अचानकपणे काम बंद आंदोलन करून गुळ सौदे बंद पाडणाऱ्या माथाडी कामगारांचे परवाने रद्द करण्याची कारवाई बाजार समिती तर्फे करण्यात येणार आहे.''

- मोहन सालपे, सचिव  

Web Title: Jaggery deal closed due to Mathadi workers Strike