सांगली कारागृहात व्हावे, स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींचे जतन ; जेल फोडो आंदोलनाचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पान ठरावे असा जेल फोडो आंदोलनाचा लढा याच कारागृहातून सुरू झाला.

सांगली : राज्य शासनाने कारागृह पर्यटनाची नवी योजना येत्या 26 जानेवारीपासून सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होणार असून, सर्वसामान्यांसाठी प्रथमच राज्यभरातील कारागृहांचे अंतरंग खुले होणार आहे. या यादीत आता सांगलीचे कारागृहही समाविष्ट व्हायला हवे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पान ठरावे असा जेल फोडो आंदोलनाचा लढा याच कारागृहातून सुरू झाला. वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हा पराक्रम नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी इथे या पराक्रमी इतिहासाच्या खुणा जपल्या पाहिजेत. 

राज्य सरकारने प्रथमच जेल सहलीची मुभा देणारा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने कारागृहाचे अंतरंग, तिथले जीवन लोकांपर्यंत पोहोचतानाच तिथल्या कारभारातही पारदर्शकता येऊ शकते. प्रत्येक कारागृहाचा एक इतिहास असतो. राज्यात सध्या साठ कारागृहे असून बहुतेक कारागृहांचा इतिहास ब्रिटीशकाळ आणि त्याआधीपासूनचा आहे. सांगलीच्या कारागृहाचा इतिहासही असा देदीप्यमान आहे.

हेही वाचा -  अनमोड मार्ग अरूंद असल्याने वाहनचालकांना अंदाज आला नाही

इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर म्हणाले, 'सांगलीचे कारागृह संस्थानकाळात म्हणजे 1860 च्या सुमारास बांधले गेले. अर्थात ते पुढे हळूहळू विकसित होत गेले. या कारागृहाच्या सभोवती नैसर्गिक खंदक- पाण्याचे झरे होते. त्यामुळे त्याला संरक्षण होते. संस्थानमधील सर्व कैदी येथे ठेवले जायचे. संस्थानमध्ये जेलचे स्वतंत्र डिपार्टमेंट, या जेलमध्ये आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र दवाखाना त्या काळातही होता. कैद्यांकडून सतरंज्या, अन्य कारागिरीच्या वस्तू बनवून घेतल्या जायच्या. दरवर्षी दक्षिण महाराष्ट्राचे पोलिटिकल एजंट आणि संस्थानचे अधिकारी या जेलला भेट द्यायचे. सांगलीचे दक्षिण महाराष्ट्रातील सुस्थितीत जेल आहे, असा अभिप्राय ब्रिटीश अधिकारी व पोलिटिकल एजंटनी सांगली संस्थानच्या दप्तरी त्याकाळात नोंदवले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकात धुमाकूळ घालणारा प्रसिद्ध नाना मासाळ या कारागृहात होता.'

ते म्हणाले, 'या कारागृहाशी निगडित भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पान अविस्मरणीय असे आहे. पद्माळे गावचा तरुण क्रांतिकार वसंत बंडूजी पाटील म्हणजे आपले वसंतदादा यांना ब्रिटिशांनी 22 जून 1943 ला अटक करून याच कारागृहात ठेवले. दादांनी तिथल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुरुंग फोडून पळून जाण्याचा कट रचला. 24 जुलै 1943 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान तुरुंग फोडून पलायन केले. अण्णा पत्रावळे, बाबुराव जाधव त्यांच्या समवेत होते. त्यांच्यावर गोळीबार सुरू होता. त्यात पत्रावळे यांचा मृत्यू झाला.

दादांना गोळी चाटून गेली, पण जीवावर उदार होऊन कृष्णा-वारणेच्या पुरातून पोहत जाऊन दादांनी पैलतीर गाठला. वसंतदादांनी महाराष्ट्राच्या इतिहासात आपली स्वतंत्र नाममुद्रा राजकारणात व समाजकारणात निर्माण केली. दादांनी जेथून उडी मारली, ते ठिकाण आजही अभिमानाने दाखवले जाते. ते ज्या बराकीत होते, तेथे आठवणी जपल्या आहेत. या जेलमध्ये दादांच्या स्मृती जपणारे छोटेखानी स्मारक व्हायला हवे.'

हेही वाचा - 'ऍबसोल्युट फीटनेस' नावाचा 100 महिलांचा ग्रुप भटकंतीच्या छंदामुळे विस्तारत आहे

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jail atmosphere is open to all middle class people in sangli jail also included