जैन बोर्डिंग होती भूमिगतांची हक्काची जागा

महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला सांगली जिल्ह्यातून मिळणारा प्रतिसाद
sangli
sanglisakal

Independence Day :

महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला सांगली जिल्ह्यातून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत होता. साधारणपणे १९३५ नंतर स्वातंत्र्याविषयी जागृती मोठ्या प्रमाणात होत होती, हे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. परंतु, १९४२ नंतर या स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक गती मिळू लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांना अटक करून चळवळ मोडून काढण्याचा सपाटा ब्रिटिशांनी लावला.

पोलिसांनी स्वातंत्र्य सैनिकांची धरपकड सुरू केली. अशावेळी चळवळीत सातत्य ठेवण्याच्या दृष्टीने वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी आदींना भूमिगत होण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करून पोलिसांना चकवा देण्याचा लपंडाव सुरू होता. यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना सर्वांत सुरक्षित आश्रयस्थान आणि स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून सांगलीतील जैन बोर्डिंग महत्त्वाचे वाटू लागले. या बोर्डिंगची स्थापना १९११ मध्ये झाली. नवीन इमारत १९२० मध्ये तयार झाली.

बोर्डिंगमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वास्तव्य वाढले. वसंतदादांचे वखार भागातील जैन कार्यकर्त्यांसमवेत जवळचे संबंध होते. त्याचा फायदा झाला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यातील अनेक सैनिकांनी बोर्डिंगला आश्रयस्थान बनवले. जहाल आणि मवाळ दोन्ही विचारसरणींच्या स्वातंत्र्य सैनिकांचे गुप्त बैठकीचे ठिकाण जैन बोर्डिंग असायचे. विद्यार्थ्यांसमवेत राहताना संशय यायचा विषयच नव्हता.

ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचा जेवणाचा डबा गावाकडून यायचा. स्वातंत्र्य सैनिकांच्या भोजनाची सोय त्यात व्हायची. डब्यांतून पत्रे, चिठ्ठी यायची, संदेश पोहोच व्हायचा. येथून अनेक कामे सिद्धीस गेली. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक कार्यांची रूपरेषा याच ठिकाणी ठरवली गेली. आर्थिक अडचणीत पैशांची देवाणघेवाण बोर्डिंगमधून चालायची. हत्यारे लपवून आदान-प्रदानासाठी ही सुरक्षित जागा मानली जायची.

वसंतदादा पाटील, अण्णासाहेब पत्रावळे, जिनपाल खोत, बाबूराव पाचोरे, हिंदूराव पाटील, जयराम कोष्टी, महादेव बुटाले इत्यादी जेल फोडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य येथे असायचे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी कित्येक महिने भूमीगत असताना जैन बोर्डिंगमध्ये आश्रयाला होते. या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची व्यवस्था बोर्डिंगमधील विद्यार्थी, वखार भागातील जैन मंडळी करायची.

त्यात अण्णासाहेब राजमाने, बाळगोंडा पाचोरे, आरवाडे कुटुंबियांचा समावेश होता. श्रीमतीबाई कळंत्रे, आप्पासाहेब बिरनाळे, धुळाप्पा नवले, भाऊसो कुदळे, चारुदत्त पाटील, शंकर धामणे, नेमू सत्याप्पा चौगुले, आर. पी. पाटील, दिपचंद व्होरा अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. वसंतदादा, नागनाथअण्णा यांच्यावर जैन विचारसरणीचा प्रभाव होता. नागनाथअण्णा इथे नियमित येत, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीतील कथा सांगत.

दिवंगत धनपाल हेरवाडे यांच्या ‘घडलंय ते मांडलंय - जैन बोर्डिंगचा इतिहास’ आणि डॉ. विलास संगवे यांच्या ‘दक्षिण भारत जैन सभेचा इतिहास’ या पुस्तकांमध्ये याबाबतचे संदर्भ ठळकपणे आले आहेत.

दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग १९११ मध्ये स्थापन झाले. स्वातंत्र्य लढ्याचा तो काळ होता. काही वर्षांत जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भूमिगत होण्यासाठीचे प्रमुख ठिकाण म्हणून हे बोर्डिंग पुढे आले. जिल्हाभरातील विद्यार्थी या बोर्डिंगमध्ये मुक्कामाला असायचे, त्यांच्यासमवेत क्रांतिकारक मुक्काम करायचे, एका डब्यात जेवायचे. तो काळ भारलेला होता...

- प्रा. राहुल चौगुले अध्यक्ष, जैन बोर्डिंग, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com