जैन ट्रस्टची लाखाची मदत; वाईत सलग नऊ दिवस अन्नदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

लॉकडाउनमुळे शहरासह संपूर्ण तालुक्‍यातील गरीब व मोलमजुरी करून जगणाऱ्या कामगारांची दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.

सातारा : कोरोनाच्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी लढत असलेल्या शासनाच्या कार्यात मदत व्हावी, म्हणून येथील पार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टच्या (श्री ओसवाल जैन पंचायत वाडा) वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस नुकताच एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त ट्रस्टच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला. सामाजिक बांधिलकीतून हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस देत असून, भगवान महावीर यांच्या संदेशाप्रमाणे जगात शांतता, समृद्धी, आरोग्य नांदावे अशी प्रार्थना समस्त जैन समाजातर्फे परिवार प्रार्थना करत आहोत, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. 

वाई : येथील जैन बांधवांतर्फे महावीर स्वामी यांच्या जनकल्याणदिनानिमित्त दर वर्षीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंती उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून आचार्य चंद्रभूषण सुरेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार लॉकडाऊनच्या कालावधीत दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सलग नऊ दिवस हे अन्नदान केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ नुकताच येथे झाला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. तालुक्‍यात अनेक कुटुंबाचे जगणे अवघड झाले आहे. हातात पैसे नसल्याने गरजेच्या वस्तूंची खरेदी करायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने जैन समाज बांधवांनी बैठक घेऊन अन्नदान उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमासाठी वाई पालिका, अजिंक्‍य मंडळ धर्मपुरी व शंकरी कट्टा यांचे योगदान लाभले.
 
लॉकडाउनमुळे शहरासह संपूर्ण तालुक्‍यातील गरीब व मोलमजुरी करून जगणाऱ्या कामगारांची दोन वेळच्या जेवणाची गैरसोय निर्माण झाली आहे. अशा लोकांची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत जे कोणी गरीब गरजू बांधव अडचणीत अडकले असतील त्याचबरोबर अन्य काही तातडीची गरज भासल्यास गरजेनुसार त्यांना योग्य ती मदत पुरवण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी दिली.

Video : त्या ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल

चक्क कोरोना संशयितासमवेतच डोहाळ जेवण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain Trust And Community Helped Migratnts In Satara District