'सीएसआर' निधीतून गरजूंना मिळताहेत जयपूर फूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सोलापूर - आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे! ही किमया होत आहे... सोलापूरच्या लोकमंगल जीवक हॉस्पिटलच्या आवारात. कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी न आणता रुग्णाला सुखद धक्का दिला जात आहे.

येथील लोकमंगल फाउंडेशनने मुंबईच्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या सहकार्याने भारतीय साधारण विमा निगमच्या "सीएसआर' निधीचा उपयोग करीत या आगळ्या निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सकाळी रुग्ण येतो. त्याची नोंदणी केल्यानंतर त्याची तपासणी व नंतर पायाचे मोजमाप घेतले जाते. त्याच्या चहापानाची आणि भोजनाचीही व्यवस्था केली जाते. या दरम्यान त्याच्या मापाचा जयपूर फूट, कॅलिपर किंवा कुबड्या यापैकी त्याच्यासाठी योग्य त्या साहित्याची तेथेच तयारी केली जाते. यासाठी जयपूरहून खास पथक आले आहे. दिवसभरात त्यांच्याकडून शंभराहून अधिक जयपूर फूट तयार होतात. रुग्णाला त्याच्या पायाच्या मोजमापाचा जयपूर फूट मिळाल्यानंतर चालत घरी परततो. जयपूर फूटबरोबर त्याला एका चांगल्या कंपनीचा बूटही दिला जातो. यासाठी कसलीही आकारणी केली जात नाही. या शिबिरात केवळ सोलापूर शहर, जिल्हाच नव्हे तर राज्याच्या अन्य ठिकाणचे रुग्ण लाभ घेत आहेत. येत्या 28 मार्चपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.

Web Title: jaipur foot needful person by csr fund