भाजप ब्रॅंड म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आयात माल

गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

महसूलमंत्री आणि पश्‍चिम महाराष्ट्राची राज्य सरकारची धुरा सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांनी परवा सांगलीत महत्त्वपूर्ण घोषणा केली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा पुढचा महापौर भाजप ब्रॅंडेड असेल. आता ब्रॅंडेड कार्यकर्ते शेखर इनामदारांच्या सत्कारात ही घोषणा झाल्याने भाजपमधला ‘तो’ ब्रॅंड महापौरपदाचा उमेदवार कोण याबद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले.  कारण भाजपने जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा असोत वा जिल्हापरिषद बहुतेक आयात मालावरच आपला ब्रॅंड छापला आहे. महापालिकेत तर असे अनेक काँग्रेस ब्रॅंडेड, मिरज पॅटर्नचे ब्रॅंडेड लोक भाजपच्याच वाटेवर आहेत. 

काही महिन्यांपूर्वी मिरज पॅटर्नच्या शिलेदारांची हाऊसफुल्ल एसटी भाजपच्या वाटेवर असल्याची वार्ता धडकली. मग आमदार सुधीर गाडगीळ यांनी बदनाम,  भ्रष्ट लोकांना भाजपमध्ये थारा नाही, असा इशारा दिला. दुसरीकडे या तथाकथित मिरज पॅटर्नच्या मदतीनेच दोन वेळा आमदार झालेल्या मिरजेच्या आमदार सुरेश खाडे यांनी गाडगीळांच्या पवित्र्यावर मौन पाळले. त्यांची अशी अहवेलना झाल्याने संतापलेल्या मिरज पॅटर्नच्या ब्रॅंडेड शिलेदारांनी पत्रपंडितांची बैठक बोलवून आगपाखड केली. आम्ही स्वयंभू आहोत. आम्हाला कोणाकडेच जायची गरज नाही. 

उलट तेच (म्हणजे भाजपवाले) आमच्या मागे लागले आहेत, असा त्यांनी दावा केला.

सांगलीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील एकापेक्षा एक  अस्सल ऐवज भाजपच्या भांडारात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर थेट जनतेतून थेट महापौर निवडीचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. म्हणजे आता कदाचित महापौर मेक इन भाजपचा आणि नगरसेवक 

भाजपच्या ब्रॅंड छापलेले असाही दादांच्या भाकिताचा आशय असावा. असो. आजघडीला महापालिकेत भाजपचे म्हणून नगरसेवक दोनच. त्यातही आता युवराज बावडेकरच सांगलीतून लढतील अशी शक्‍यता. कारण भाजपच्या ब्रॅंड नेत्या नीता केळकर यांच्या कन्या स्वरदा आता पुण्याच्या सासूरवाशीन होणार असल्याने त्या सांगलीतून लढण्याची शक्‍यता जवळपास नाहीच. त्यामुळे भाजपला स्वपक्षातील ब्रॅंडेड कार्यकर्त्याचा शोध घेण्यासाठी दुर्बिणीचाच आधार घ्यावे लागेल. 

प्रत्यक्षात भाजपची राज्यात सत्तेत आल्यापासूनची मोडस लक्षात घेता अशा दुर्बिणीची गरज उरणार नाही असेच दिसते. कारण हरेएक नमुन्याचा माल घ्यायचा आणि त्यावर भाजपचा ब्रॅंड छापायचा अशीच भाजपच्या नेत्यांची चाल राहिली आहे. त्याचे काही दाखलेही सध्याच्या महापालिकेतील भाजपात आहेतच. जसे काँग्रेसमध्ये हयात घालवलेले मुन्ना कुरणे. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवशक्ती संगम शिबिर केल्यानंतर हाफ चड्डीतील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले होते. एका शिबिरात त्यांचा झालेला कायापालट पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. काँग्रेसनंतर राष्ट्रवादीत काही काळ विश्रांतीचा काळ काढून पुन्हा भाजपवासी झालेल्या माजी  आमदार दिनकर पाटील देखील भाजपसाठी ब्रॅंडेड ठरले आहेत. तेच कुपवाडच्या धनपालतात्या खोत यांचे. अशा सध्याच्या भाजपवासी नेत्यांचे दीर्घ काळचे अनेक सहकारी अद्यापि काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असून ते तिकडून त्यांना खुणावतात. त्या साऱ्यांनाच कदाचित निवडणुकीआधी पक्षात घेऊन त्यांचे ब्रॅंडिंग व्हायची शक्‍यता आहे. चंद्रकांतदादांच्या दृष्टीने हेच भाजपचे ब्रॅंडिंग असावे. 

मिरज भाजपमध्ये दोन-तीन मतप्रवाह आहेत. तिथले भाजपचे नेते मकरंद देशपांडे कधी काळी मिरज पॅटर्नच्या शिलेदारांपैकीच. मिरज संघर्ष समिती नामक झेंडा  त्यांच्या खांद्यावर असे. त्यामुळे या सर्वच शिलेदारांना पक्षात सोबत द्यायला त्यांना तशी कोणतीच अडचण  नाही. आता ते भाजपचे राज्य सरचिटणीसही आहेत. त्यामुळे त्यांना थेट भाजपची दीक्षा देण्याचाही त्यांना अधिकार प्राप्त झाला आहे. दुसरा प्रवाह म्हणजे या शिलेदारांना आधी प्रवेश देऊन टीका झेलत बसण्यापेक्षा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत प्रवेश द्यावा. म्हणजे त्या गदारोळात जनतेले जे बहिरेपण येते त्याचा फायदा घेता येईल असाही काहींचा कयास आहे. एकूण भाजपचे ब्रॅंडिंग म्हणजे काय याचा बोध होईपर्यंत अशा अनेक शंका-कुशंकांना मोठा वाव आहे.

‘जेजेपी’चे आमदार, खासदार...
कधीकाळी संघाचे ‘वर्ग’ केलेले प्रशिक्षित कार्यकर्ते भाजपमध्ये यायचे. सांगलीतील बीजेपी ओळख तर जेजेपी (जयंत जनता पार्टी) अशीच होती. याच जेजेपीचे आमदार-खासदार झाले. अनुभव असा की जेजेपी किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी प्रशिक्षित कार्यकर्तेच भाजपमध्ये येतात. कदाचित तोच भाजपचा नवा ब्रॅंड असावा. चंद्रकांतदादांनी तर त्यांचा मातृजिल्हा कोल्हापूर जिल्हा तर काँग्रेसच्या आयातीनेच भरून टाकला आहे. दादा कदाचित त्यालाच भाजपचा ब्रॅंड म्हणत असावेत.

Web Title: Jaisingh Kumbhar article sangli bjp congress NCP