जळगाव घरकुल घोटाळा ः वकील बदलल्याने अण्णा नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

राळेगणसिद्धी :- जळगाव घरकुल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या खटल्यातील आरोपींशी पूर्वी संबंध होते, असा आरोपही अण्णांनी केला आहे.

या घोटाळ्याबाबत अण्णा हजारे यांनी 2003 मध्ये आंदोलन केले होते. या खटल्यात सुरवातीपासून ऍड. प्रदीप चव्हाण यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक काम पाहिले असून, त्यांनी आरोपींना शिक्षेपर्यंत पोचवले आहे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. असे असतानाही चव्हाण यांना पुढील कामकाजात विशेष सरकारी वकील म्हणून ठेवण्याऐवजी याच खटल्यातील काही आरोपींशी पूर्वी संबंध असलेले वकील अमोल सावंत यांची मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांना सावंत यांचे सहायक म्हणून नियुक्त केले आहे. हा निर्णय अयोग्य आणि संशयास्पद आहे, असे अण्णांनी म्हटले आहे.

अण्णा हजारे रुग्णालयात असताना, चव्हाण यांच्याऐवजी सावंत यांची नेमणूक होणार असल्याचे त्यांना समजले होते. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तत्काळ फोन करून या प्रकरणात वकील बदलल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी "असे काही होणार नाही,' असे आश्‍वासनही दिले होते.

तरीही शासनाकडून ऍड. सावंत यांची नियुक्ती केल्याचे आदेश निघाले. त्यावर अण्णांनी मुख्यमंत्र्यांना ऍड. सावंत यांची नियुक्ती न करता प्रदीप चव्हाण यांच्याकडेच या खटल्याचे कामकाज ठेवावे, अशी मागणी रविवारी केली. त्यानंतर सरकारकडून योग्य निर्णय होईल, अशी प्रतीक्षा केली. परंतु अद्याप शासनाने त्याबाबत निर्णय न घेतल्याने अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon Gharkul Scam: Anna upset over changing lawyer