...तर जगतापच आमचा पक्ष

...तर जगतापच आमचा पक्ष

जत - विधानसभा मतदार संघात वेगळाच डाव मांडण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. काही लोक कर्नाटकातील मंत्र्यांना भेटायला काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन जातात. काहीजण बंडखोर गोपीचंद पडकरांचे समर्थन करत त्यांच्यासोबत फिरतात. भाजपमध्ये हे चालत असेल, तर भाजप आम्हाला चालणार नाही. भाजप नाही, तर जगताप हा आधी आमचा पक्ष आहे, अशी  उघड भूमिका घेत आमदार विलासराव जगताप  समर्थकांनी आज भाजपच्या बैठकीत आक्रमक पवित्रा धारण केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रविवारच्या नागज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांनी जत येथील उमा नर्सिंग हॉलमध्ये भेट घेतली. त्यात पक्षांतर्गत वाद, कुरघोडी समोर आली. काही मंडळी भाजपअंतर्गत धुसफुशीला खतपाणी घालत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा निर्वाणीचा इशाराच या बैठकीत देण्यात  आला. जि.प. सदस्य सरदार पाटील, सुनील पवार, मनोज जगताप, उमेश सावंत, विजय ताड, प्रमोद सावंत,  लक्ष्मण बोराडे, संजीव सावंत, राजू चौगुले यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी जतबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी केली. 

आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून आमदार विलासराव जगताप हाच आमचा पक्ष आहे. जगतापांनाच काही मंडळी डावलून परस्पर कर्नाटकचे मुख्यमंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्री यांना भेटताहेत. निवेदन देत आहेत. आगामी विधानसभेसाठी वेगळी चूल मांडण्याचा उद्योग सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर काही मंडळी उघड फिरताहेत. जगतापांनी व  पक्षांनी ज्यांना पदे दिली त्या मंडळींची भाषा बदलली आहे. प्रथम त्यांच्यावर कारवाई करा, मगच बोला. अन्यथा बैठकीतून निघून जाऊ, असा पवित्रा घेतला.  

त्यातून वाद सुरू झाला. दोन्ही गट आमने सामने आले. काही काळ तणाव झाला. मकरंद देशपांडे, श्री. जगताप यांनी त्यांना शांत केले. श्री. देशपांडे यांनी आमदार जगताप यांचा भाजपसोबतचा प्रवास वर्णन करत त्यांचा पक्षातील स्थान अढळ असल्याचे सांगितले. 

जतमध्ये त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, असे जाहीर केले. आमदार जगताप यांनी भाजपसाठी डॉ. रवींद्र आरळी यांचे योगदान विसरून चालणार नाही, असे सांगत वडिलकीची भूमिका घेतली. 

आमदार जगताप म्हणाले, ‘‘तालुक्‍यात जे घडतेय तेच कार्यकर्ते बोलताहेत. एका गटाच्या अंतर्गत कुरघोड्या, बैठका सुरू आहेत. त्याला जिल्ह्याचे नेते खतपाणी  घालत आहेत. पडळकर जाहीरपणे भाजपवर टीका करत असताना जतमध्ये त्यांच्या समर्थनार्थ भाजपचे नेते फिरताहेत. तुबची बबलेश्वर योजनेवरून राजकारण तापवले जात आहे. खासदार, आमदार यांना वगळून  काही मंडळी शिष्टमंडळाच्या नावाखाली कर्नाटक मुख्यमंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्री यांना भेटत आहेत. ज्यांना भाजपने पदे दिली आहेत तेच आमच्याविरुद्ध काम करताहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन या रिंगणात उतरावे.’’

श्री. जगताप यांच्यासह पंचायत समिती सभापती सुशीला तावशी, जि.प. सभापती तम्मनगौडा रवी पाटील, डॉ.  रवींद्र 
आरळी, प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव, ॲड. श्रीपाद अष्टेकर, बसवराज बिरादार, सुनीता जाधव, सरदार पाटील, चंद्रकांत गुडोडगी, विष्णू चव्हाण, प्रमोद हिरवे, शंकर वगरे, अरविंद गडदे, आप्पासाहेब नामद, अण्णा भिसे, मिलिंद पाटील, प्रवीण यादव 
उपस्थित होते. 

जगतापसाहेबांची उमेदवारी मी मागतो
डॉ. रवींद्र आरळी यांच्या भाषणावेळी जगताप समर्थकांनी ‘आधी विधानसभा निवडणुकीविषयी भूमिका स्पष्ट करा’, अशी मागणी केली. डॉ. आरळी यांनी पक्षाचा निर्णय मानू, असे सांगितले. जगताप समर्थकांना ते पटले नाही. त्यांनी ‘जगतापसाहेबांचा प्रचार करतो’, असे जाहीर करण्याची मागणी केली. डॉ. आरळी यांनी ‘आपण स्वतः जगतापसाहेबांसाठी उमेदवारी मागू’, अशी घोषणा केली.

पडळकर बेदखल
मकरंद देशपांडे यांनी गोपीचंद पडळकर यांना भाजपमधून बेदखल केल्याचे जाहीर केले. त्यांचा अहवाल प्रदेश भाजपला पाठवला आहे. त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com