बावीसशे यात्रा अन्‌ २७ कलापथके...!

कलापथकाचे संग्रहित छायाचित्र
कलापथकाचे संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आता कलापथकांच्या सराव तालमींना वेग आला असून यंदाच्या हंगामात तब्बल २२०० यात्रा आणि २७ कलापथके असेच चित्र राहणार आहे. जिल्ह्यासह सांगली आणि साताऱ्याच्या कानाकोपऱ्यात करमणुकीचा बार उडवणाऱ्या या कलापथकांना यंदाही आगाऊ मागणी आहे. दरम्यान, कलापथकांतील कलाकारांसाठी संघटितपणे कामही आता सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व कलाकारांचे अपघात विमे उतरवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 

येथील कलापथकांच्या परंपरेला संगीत मेळ्यांची मोठी पार्श्‍वभूमी आहे. गणेशोत्सवात हे मेळे सादर व्हायचे. मेळ्यातील नाटकाची पटकथा आणि गाणी मेळ्याच्या प्रमुखानेच लिहायची. त्याला सर्वांनी संमती दिल्यानंतर ती रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच तालमी सुरू व्हायच्या. सिद्धार्थनगरातील (कै) हरी आबा सरनाईकांचा ‘अलंकार’, वसंतराव लिगाडेंचा ‘रत्नदीप’, (कै) गुलाब मानेंचा ‘तुषार’, बिंदू चौकातील चौधरी-कपडेकरांचा ‘किरण’, शिवाजीराव भोसलेंचा ‘विश्वभारती’, शाहूपुरीतील मुजावरांचा ‘ताज’, पापाची तिकटी परिसरातील जाधव बंधूंचा ‘विकास’ आणि शुक्रवार पेठेतील ‘सम्राट’, ‘बालवीर’ अशा मेळ्यांनी सत्तरच्या दशकापर्यंत साऱ्या शहराचे मनोरंजन केले. 

‘अगाड्याचं बगाडं’, ‘दे दान-सुटे गिराण’, ‘ठासून झालं पाहिजे’, ‘बोलायचं नाही’, ‘बघा जमलं तर’, ‘अफाट नगरीचं सपाट राज्य’, ‘बापाच्या गळ्यात घंटा’ अशा नावांची या ंमेळ्यातली छोटी नाटकं आणि ‘शत्रूला मूठमाती देण्या करा तुम्ही निर्धार’, ‘जातीयवादी मर्कटांनी घातलाय धिंगाणा, वेळीच आवरा अशा बेट्यांना लावूनिया सापळा’, अशा गीतांचा साज त्यांना असायचा. प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर, सिनेतारका उमा, माया जाधव आदींची कारकीर्द या मेळ्यातूनच बहरली. मात्र सत्तरच्या दशकानंतर संगीत मेळ्यांची जागा कलापथकांनी घेतली. सुरवातीला चित्रपटातील गीतांवर नृत्याविष्कार आणि त्यानंतर छोटे नाटक, असे या कलापथकाचे स्वरूप. यात्रा-जत्रांच्या निमित्ताने अख्खी गावं रात्री दोन-अडीचपर्यंत हा कलाविष्कार बघायची. बदलत्या काळात आता या पथकांतील नाटकांची वेळही एक तासाची झाली आहे. एका कार्यक्रमासाठीची ‘सुपारी’ तीस ते पस्तीस हजारांवर गेली असली तरी पश्‍चिम महाराष्ट्रातील यात्रा-जत्रांच्या निमित्ताने कलापथकांची परंपरा जपली गेली आहे.

प्रबोधनाची परंपरा
संगीत मेळा असो किंवा कलापथकांनी विनोदी ढंगातून सादरीकरणावर भर दिला असला तरी प्रबोधनाची परपंरा कायम ठेवली आहे. यंदा कलापथकांतून शेतकरी आत्महत्येपासून ते आगामी निवडणूकांपर्यंतच्या विविध विषयावर प्रबोधन होणार आहे.

तीनही जिल्ह्यांत मिळून सुमारे बावीसशे यात्रा असतात आणि एका कलापथकावर किमान २५ ते ३० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.  
- मुकुंद सुतार, अध्यक्ष, कलापथक संघटना

प्रत्येक कलाकाराचा अपघात विमा आम्ही उतरवतो. प्रत्येक वर्षी नव्याने काही कलाकार येतात. त्यांचेही विमे गणेशोत्सवापूर्वी उतरवले जातात.
- मिलिंद अष्टेकर, न्यू सैराट म्युझिकल नाईट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com