पतंगराव मुख्यमंत्री झाले असते तर राज्याचे चित्र वेगळे असते..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली : पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे आजचे चित्र वेगळे दिसले असते. त्यांची कामाची अखंड धडाडी महाराष्ट्राच्या हितासाठी होती अशा भावना आमदार जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या. विविध क्षेत्रातील समस्त सांगलीकरांनी आज कदमसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

सांगली : पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे आजचे चित्र वेगळे दिसले असते. त्यांची कामाची अखंड धडाडी महाराष्ट्राच्या हितासाठी होती अशा भावना आमदार जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या. विविध क्षेत्रातील समस्त सांगलीकरांनी आज कदमसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

येथील भावे नाट्यगृहात साहेबांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांपासून राजकीय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, धाडसी राजकारणी, क्रीडा संघटक, जिव्हाळा जपणारा नेता, संवेदनशील दातृत्वाचा झरा अशा विविध रुपातील पतंगरावांचे दर्शनच विविध मान्यवरांनी आपल्या जीवनभराच्या आठवणीतून उभे केले. 

सुमारे पस्तीस वर्षाच्या एकत्रित राजकीय वाटचालीवर भाष्य करताना जयंतरावांनी कॉंग्रेस आघाडी सरकारमधील जिल्ह्याच्या त्रिकुट मंत्री कालखंडाला जणू उजाळा दिला. पतंगराव म्हणजे आकाशाला गवसणी घालणारा नेता होता हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट व्हायचे. एखादी शाळा काढतेवेळीच भारती विद्यपीठ असे नाव द्यायचे धाडस पतंगरावच करु शकतात. त्यांनी मला सांगितलेले एक वाक्‍य मी सदैव स्मरणात ठेवेन. ते मला म्हणायचे ""जयंत घर सोडू नको'' त्यातून आपल्या परिसराची मातीची जाण सतत ठेवली पाहिजे. मंत्रीमंडळात सिंचन योजनांची बिले भरण्याचा जेव्हा जेव्हा विषय यायचा तेव्हा आमचे सेटींग मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्याही लक्षात यायचे. तेच स्वतःहून म्हणायचे, हं आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही तिघेच बसून करा. आर.आर. आणि माझ्यामध्ये बसलेल्या पतंगरावांची फिरकी घ्यायच्या हेतूने म्हणायचो," साहेब तुम्ही आमच्या पक्षात असता तर...मुख्यमंत्री झाला असता.'

त्यावर ते म्हणायचे, ""आरे मी आणि माझा पक्ष बघून घेतो. तुम्ही त्यात लक्ष घालायचे कारण नाही.'' कॉंग्रेस पक्षावरील त्यांची अविचल निष्ठा कायम होती. पलूस तालुका करण्यासाठी त्यांनी माझ्या कार्यालयात चार तास तळ ठोकला होता. फाईल क्‍लिअर करूनच ते उठले. जाताना त्यांनी वित्तमंत्री म्हणून तू योग्य वागलास असाही शेरा मारायला ते विसरले नाहीत. महापूराच्या काळात उंबरठ्याच्या आत पाणी आले की माणसी एक हजार रुपये द्यायचा निर्णय त्यांनी ज्या गतीने रेटला ते पाहून सारे थक्क झाले. त्यांची ही धडाडी महाराष्ट्र हिताची होती. मुख्यमंत्री झाले म्हणजेच सारे झाले असे नाही हे खरेच. मात्र ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते.'' 

खासदार संजय पाटील म्हणाले,"" पतंगरावांच्या निधनाने जिल्ह्याची आणि राज्याची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्याचे पालकत्व घेतलेला हा नेता आपल्यात नाही यावर विश्‍वासच बसत नाही.'' 

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले,"" कोल्हापूर जिल्ह्याची नाडी माहित असलेला हा नेता होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कडाकपारीतील कार्यकर्त्यांशी थेट ओळख त्यांची असे. वस्त्रोद्योगासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी माझी एक सदस्यीय समिती नेमली आणि मी केलेल्या सर्व शिफारशी मंत्रीमंडळाला स्वीकारण्यास त्यांनी भाग पाडले. महापूराच्या काळात शिरोळ, इचलकरंजीला सर्वाधिक फटका बसला. मदत व पुनवर्सन मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी घेतलेले निर्णय अभूतपुर्व होते.'' 

प्रा.जे.एफ.पाटील म्हणाले,"" पतंगरावांची शैक्षणिक कामगिरी अद्वितिय होती. त्यांनी घातलेल्या पायामुळे भविष्यात भारती विद्यापीठ जागतिक स्तरावर झेप घेईल याबद्दल मला खात्री वाटते.''

प्रा.तारा भवाळकर म्हणाल्या,"" पतंगरावांना आपल्या भागातील माणसांबद्दल जिव्हाळा होता. शेतकरी जीवनातून घडलेले हे अस्सल नेतृत्व होते. एरवी पुण्या मुंबईच्या साहित्यक वर्तुळात राजकारण्यांबद्दल बनलेली मते वास्तवाला धरून नव्हती याची प्रचिती मला त्यांच्याकडे पाहून सतत येत गेली. गेल्या चाळीस वर्षाच्या माझ्या सांगलीतील सहवासात मला वसंतदादा ते पतंगराव अशा राजकारण्यांना पाहता आले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सतत आदरच वाढत गेला. स्त्री साहित्यकांच्या इतिहास लेखनासाठी त्यांनी स्वतःहून मदत देऊ केली. '' 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलिप पाटील म्हणाले,"" आणीबाणीच्या काळात कॉंग्रेस पक्षाने 20 कलमी कार्यक्रम राबवला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय नेतृत्व करणारे प्रभावी पतंगराव मी अनुभवले होते. त्यावेळी मी एनएसयुआयचा अध्यक्ष होतो. त्यानंतच मी सतत त्यांची धडाडी अनुभवत होतो. राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाला इंद्रप्रस्थ नेटींगसाठी देऊ केलेली आठ एकर जमीन ज्या तत्काळ गतीने उद्योगमंत्री म्हणून मंजूर केली. अशी धडाडी सरकारदरबारी कधी पाहिली नाही.'' 

खासदार राजू शेट्टी म्हणाले,"" ऊस आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्याशी सतत संघर्ष झाला मात्र त्यांनी कधीही तो मनान न ठेवता दिलदारपणे आम्ही सांगितलेली सर्व विकासकामांना मदत केली. 2002 च्या दरम्यानचे आंदोलन असावे. आम्हाला त्यांनी कोल्हापूरात चर्चेला बोलवले. आमचे सर्व कार्यकर्ते अटकेत होते. त्यांना सोडण्याची मी अट घातली. सारे कार्यकर्ते बाहेर आले आणि पसार झाले. आंदोलन पुढे वाढत गेले. मात्र आमच्या या कृतीचा त्यांनी मनात राग ठेवला नाही. एकदा त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन झाले. मला फोन आला. म्हणाले,राजू अरे आंदोलने अशी व्यक्तीगत पातळीवर कधी न्यायची नसतात. त्यांनी सांगितलेला तो धडा मी घेतला आणि त्यानंतर मी कोणतेही आंदोलन व्यक्तीगत पातळीवर नेले नाही. खुल्या मनाचा हा दिलदार नेता होता. मोठ्या संघर्षातून त्यांनी लाखो लोकांच्या हिताचा कारभार केला. '' 

माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले,"" अवघ्या साडेतीन रुपये खर्चाच्या एसटीडी कॉलच्या खर्चात मला कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. पतंगराव कदम हे परिस होते. ज्यांना या परिसाचा स्पर्श झाला त्यांचे सोने झाले. त्यात मीही आहे.'' 

पृथ्वीराज पवार म्हणाले,"" कुस्ती क्षेत्राला उर्जितावस्था देणारा हा राजकारणी होता. मध्यंतरी कुस्ती अडचणीत आली असता त्यांनी कुस्ती मैदाने भरवण्यासाठी पुढाकार घेतला आणि बघता बघता राज्यभर मोठी मैदाने सुरु झाली.'' 

कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले,"" त्यांनी कडेगावला घेतलेले महाराष्ट्र केसरी मैदान अभूतपुर्व असे झाले. त्यानंतर झालेल्या प्रत्येक मैदानावेळी त्या आठवणी राज्यभरातले मल्ल सांगत असतात. त्यांनी कडेगावला उभे केलेले कुस्ती संकुल देशातील अद्वितिय असे आहे. कुस्तीगिरांच्या पाठीशी राहणारा हा क्रीडाप्रेमी नेता होता.'' 

भाजप नेत्या नीता केळकर म्हणाल्या,"" पक्षापलीकडे जाऊन पतंगरावांनी कामे केली. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला.'' यावेळी वैजनाथ महाजन, कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,प्राचार्य डी. जी. कणसे आदींची भाषणे झाली. विविध धर्मियांच्यावतीने प्रार्थना झाल्या. यावेळी कदम कुटुंबियांच्यावतीने आमदार मोहनराव कदम, विश्‍वजीत कदम, सौ. स्वप्नाली कदम, हणमंतराव कदम, जितेश कदम, महेंद्र लाड आदी उपस्थित होते. 

ते पाप मी करणार नाही... 
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज पतंगरावांच्या आठवणी सांगताना राजारामबापूंच्या पश्‍चात त्यांनी दिलेल्या आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व विश्‍वजीत यांना उद्देशून म्हणाले, "" मी तुला शब्द देतो की तुझ्या पाठीशी आम्ही सदैव राहू. तुला त्रास होईल असे पाप माझ्याकडून कधीही होणार नाही.'' पतंगरावांनी टंचाई निधीतून सिंचन योजनांना ज्या सहजतेने निधी मिळवून दिला ते चित्र आज दिसत नाही अशी खंतही श्री पाटील यांनी आज व्यक्त केली.

Web Title: Jayant Patil pays tribute to Patangrao Kadam