
मंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटाने आरोग्याचे महत्व लोकांना कळले आहे
नवेखेड (सांगली) : येत्या काही दिवसात सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत बनविणार असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. रेठरे हरणाक्ष (ता.वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदघाटन व इतर विकास कामांचे लोकार्पण असा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बी. डी पवार अध्यक्षस्थानी होते.
दिलीपराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कृष्णेचे संचालक सुजित मोरे, विनायकराव पाटील, विजय पाटील, संग्राम पाटील, माजी सभापती सचिन हुलवान, उपसरपंच निलेश पवार, उमेश पवार, खरातवाडीचे माजी सरपंच अविनाश खरात, यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - आरोग्य राज्य मंत्री राजेश पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले -
यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटाने आरोग्याचे महत्व लोकांना कळले आहे. भविष्यात सरकारी यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे, अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले जाईल. यामध्ये किमान प्राथमिक तपासणीच्या सुविधा असतील. त्याचबरोबर प्राथमिक शाळा ही सुंदर केल्या जातील. पहिल्या टप्प्यात १४१ शाळा यासाठी निवडल्या आहेत. नंतर इतर शाळाही हळूहळू घेतल्या जातील. तसेच भविष्यात क्षारपडीचे प्रमाण वाढू नये, जमिनी टीकाव्यात यासाठी शासन स्तरावर ८० टक्के रक्कम सरकार व वीस टक्के रक्कम शेतकऱ्यांची आशा पद्धतीची योजना राबविण्याचा विचार असुन त्यासाठी प्राथमिक काम सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. अजुनही कोरोनाचे थोडेफार सावट आहे. काळजी घ्या असे आवाहव त्यांनी केले. यावेळी ग्रामास्थांच्या वतीने मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हापरिषदच्या वतीने विविध योजनांचा लाभ मतदार संघात मिळवून दिल्याबद्दल धनाजी बिरमुळे यांचा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंदकुमार कोळेकर, उमेश कोळेकर, संदीप जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम बापू कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे यांनी आभार मानले.
हेही वाचा - उलटसुलट चर्चेला मिळाली चालना
संपादन - स्नेहल कदम