सौजन्याच्या मागेच लक्ष्मी!

सौजन्याच्या मागेच लक्ष्मी!

कोल्हापूर - स्वप्न बघा... त्यासाठीच्या कष्टाचेही योग्य नियोजन करा आणि जे कराल ते सौजन्यानेच करा... कारण सौजन्याच्या मागेच लक्ष्मी असते... असा मूलमंत्र आज प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांनी दिला. दीड तासाच्या या निखळ संवादात त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त करताना खणखणीत आत्मविश्‍वास कसा असतो, याची प्रचितीही दिली. निमित्त होते, संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेचे. या मालिकेतील आज सांगतेचे पुष्प त्यांनी गुंफले. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन झाले. 

जयंती कठाळे ‘आयटी’मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी असलेल्या आणि जबाबदारीची पदं भूषवणाऱ्या. मात्र, परदेशातील दौऱ्यावर असताना चायनीज, इटालियन असे पदार्थ खाताना त्यांना आपल्या अस्सल मराठमोळ्या मातीतील पदार्थ त्याहीपेक्षा अधिक चवीचे असून ते जगभर पोचले पाहिजेत, असे वाटायला लागले. एका टप्प्यावर अखेर त्यांनी नोकरी सोडून बंगळूरमध्ये ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरंटची स्थापना केली. त्याची व्याप्ती आता जगभर पोचली आहे.

येत्या काळात त्यांना जगभरात पाच हजार शाखा सुरू करायच्या असून त्यासाठी त्या तितक्‍याच खंबीरपणे कार्यरत आहेत. त्यांचा हा सारा प्रेरणादायी प्रवास यावेळी उलगडला. त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे तब्बल १८२ मेन्यू आम्ही सध्या दररोज देतो. प्रत्येक थाळीला प्रत्येक वाराशी जोडले असून ‘शिरवाळे’सारख्या हजारो वर्षांपूर्वीच्या रेसिपीचा अभ्यास करून तीही उपलब्ध केली आहे. अर्थात, या साऱ्या प्रवासात या क्षेत्राचा केलेला परिपूर्ण अभ्यास खूप महत्त्वाचा ठरला.’’ 

साप्ताहिक सुटी कधीच घेतली नसल्याचे सांगून त्यांनी आपला दिनक्रमही नमूद केला. पहाटे साडेतीनला त्यांचा दिवस सुरू होतो आणि घरातली सगळी जबाबदारीची कामं आटोपून त्या ‘पूर्णब्रह्म’कडे जातात. रात्री साडेबाराला त्यांचं काम संपतं. अर्थातच केवळ चार तासांची झोप पुरे आहे. मात्र, जे काम करते ते पूर्णपणे आनंदात करते, असेही त्या आवर्जून सांगतात.
अमराठी भागात शाखा विस्तार करताना भाषेपासूनच्या अनेक अडचणी असतात; पण त्याचे योग्य नियोजन केले की सर्व गोष्टी आपोआप जमत जातात. मणिपूर, नेपाळची मुलंही कामाला आहेत. त्यांना अथर्वशीर्ष, शुभंकरोति शिकवली असल्याचे सांगून मराठी असल्याचा अभिमान असायलाच हवा आणि तो बाणा जगभर दिमाखात मिरवला जायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

गर्भवती व बाळंतिणींसाठी विशेष सुविधा, लहान मुलांसाठी तब्बल ४८ मेन्यू, थाळी पूर्ण फस्त करणाऱ्यांना पाच टक्के सवलत, इन्फोसिस आणि सुधा मूर्ती यांच्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं, त्यांनी भेट दिलेली अंबाबाईची मूर्ती आदी गोष्टींवरही त्यांनी दिलखुलास संवाद साधला. दरम्यान, मिलिंद कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. जयंती कठाळे यांचे वडील तसेच नातेवाईकही यावेळी उपस्थित होते. त्यांच्यातर्फे कठाळे यांना माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आला.

जयंती कठाळे सांगतात...

  •  प्रत्येक महिला ही दामिनी आहे. तिने उद्योग, व्यवसायात यायलाच हवे.
  •  जे करायचे आहे त्याचे प्लॅनिंग करा. त्यासाठीची सपोर्ट सिस्टीम तयार करा आणि झपाटून कामाला लागा.
  •  पती आणि पत्नीतील नातं अधिक पारदर्शक ठेवा. एकमेकांना बळ देतच आहे त्या क्षेत्रात यशाला गवसणी घाला.
  •  पतीकडून हिऱ्याचे पेंडंट घेण्यापेक्षा ते आपण स्वतः विकत घेऊ, अशी जिद्द बाळगा.
  •  प्रेम करायला शिका, प्रेम मिळत जाईल.
  •  सासू असो किंवा आई; दोघींबरोबर आपली भूमिका स्पष्टपणे मांडा.

साडेतीन लाखांवर पुरणपोळ्या
रेस्टॉरंटमध्ये अगोदर सर्व कर्मचाऱ्यांचे पोट भरले जाईल, याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर मग ते कामाला लागतात. त्यांच्याशी मैत्रिपूर्ण आणि निखळ नात्यासाठी जाणीवपूर्वक संवादाच्या विशिष्ट शैलीही विकसित केल्या. नऊवारी साडी आणि नथ हा पेहरावही ब्रॅंड बनवला. आजवर साडेतीन लाखांवर पुरणपोळ्या विकल्या. फ्रॅंचाईजीची घोषणा करताच तब्बल ३६ हजारांवर रिक्वेस्ट आल्याचेही जयंती कठाळे अभिमानाने सांगतात.

प्रायोजक असे... 
टायटल स्पॉन्सर - संजय घोडावत ग्रुप स्टार एअर 
सहप्रायोजक - तनिष्क शोरूम, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मार्व्हलस इंजिनिअर्स 
हॉस्पिटॅलिटी पार्टनर - हॉटेल सयाजी 
ट्रॅव्हल पार्टनर - मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रा. लि. 
फर्निचर पार्टनर - लकी फर्निचर 

प्रत्येकाच्या मनामनांत नवचेतना जागवणारा ‘ऊर्जा’ हा उपक्रम असून यंदाच्या उपक्रमातूनही नक्कीच अनेकांच्या करिअरला दिशा मिळणार आहे. उद्योजक, व्यावसायिकांनाही या उपक्रमातून नवीन प्रेरणा मिळाली.
- प्रसाद कामत, तनिष्क शोरूम

समाजाच्या विविध क्षेत्रांतील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या विचार व कृतीची एक चांगली शिदोरी ‘ऊर्जा’ या उपक्रमातून मिळाली. ही शिदोरी प्रत्येकाला आपापल्या प्रवासात नक्कीच आत्मविश्‍वास देणारी ठरणार आहे.
- डॉ. भारत खराटे, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन
   
‘ऊर्जा’ हा उपक्रम प्रत्येक वर्षीसारखा यंदाही साऱ्यांनाच सळसळती ऊर्जा देणारा ठरला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नक्कीच साध्य होत असून सर्वच घटकांना आपापली वाटचाल पुढे सुरू ठेवताना या ऊर्जेचा फायदा होईल.
- संग्राम पाटील, मार्व्हलस इंजिनिअर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com