जयसिंगपुरात मटण ५२० रुपये प्रतिकिलो

जयसिंगपुरात मटण ५२० रुपये प्रतिकिलो

जयसिंगपूर - आंध्र प्रदेश आणि केरळच्या व्यावसायिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याने बकऱ्यांचे भाव वधारले आहेत. बकऱ्यांच्या दरात दुप्पट ते अडीच पटीने वाढ झाल्याने शहरातील मटणाचे दर ५२० रुपये प्रतिकिलोच्या घरात पोहोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हे दर सर्वाधिक असून शहरातील व्यापाऱ्यांना बोकड खरेदीसाठी आता दीडशे ते दोनशे किमीवर धाव घ्यावी लागत आहे. 

जयसिंगपूर हे शिरोळ तालुक्‍यातील सर्वांत मोठे शहर आहे. पालिकेने स्वतंत्र मटण मार्केटची उभारणी केली आहे. शहरात सुमारे पंधरा मटण विक्रीची दुकाने आहेत. याआधी ४८० रुपये किलो मटणाचे दर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ५२० रुपयांपर्यंत वाढवले आहेत. यामुळे खवय्यांमधून नाराजीचा सूर आहे. शहरातील व्यावसायिक कर्नाटकातील अथणीसह महाराष्ट्रातील जत, माडग्याळ, आटपाडी, सलगर, कवठेमहांकाळमधून बकऱ्यांची खरेदी करत होते. मात्र, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये बकऱ्यांची टंचाई निर्माण झाल्याने तेथील व्यावसायिकांनी आपला मोर्चा कर्नाटकातील या बाजारपेठांकडे वळविला आहे. यामुळे बकऱ्यांच्या दरात कमालीची वाढ झाल्याने पशूपालकांमध्ये समाधान असले, तरी शहरातील व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. 

परराज्यातील व्यावसायिकांमुळे बकऱ्यांच्या किमतीत दुप्पट ते अडीच पटांनी वाढ झाल्याने खरेदी, वाहतूक आणि विक्रीचा ताळमेळ घालताना व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे. ही बाजू व्यावसायिकांची असली, तरी वाढवलेला दर मात्र अवास्तव असल्याची भावना खवय्यांची बनली आहे. कोल्हापूर शहरात मटणाचे दर ४८० ते ५०० रुपयांच्या घरात असताना जयसिंगपूर शहरात मात्र मटणाचे दर सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

आंध्र प्रदेश आणि केरळच्या व्यावसायिकांनी जवळच्या बाजारपेठांतून बकऱ्यांची जादा दराने खरेदी सुरू केल्याने साहजिकच बकऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे. यातून दराची स्पर्धा सुरू असली, तरी शहरातील सर्वच दुकानातून चांगल्या दर्जाचे मटण विक्री केले जाते. पैशापेक्षा दर्जा पाहून ग्राहकांकडून मटण खरेदी केले जाते. 
- शामराव घोडके,
अध्यक्ष, जयसिंगपूर खाटीक संघटना

आंध्र, केरळला ६६० ते ७०० रुपये प्रतिकिलो
आंध्र आणि केरळला बकऱ्यांची टंचाई असल्याने मटणाच्या दराने उच्चांक गाठला आहे. याठिकाणी ६६० ते ७०० रुपये किलो दराने मटणाची विक्री होत असल्याने जादा दराने कर्नाटकातून व्यावसायिक बकऱ्या खरेदी करत आहेत. याचा परिणाम शहरात मटणाच्या दरावर झाला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकात बकऱ्यांची टंचाई
मिरज, वडगाव, रायबाग आदी शहरातील व्यावसायिक बकऱ्यांची खरेदी करत होते. मात्र, याभागात बकऱ्यांची टंचाई असल्याने शहरातील व्यावसायिकांनी कर्नाटकातील बाजारपेठांना जवळ केले. मात्र परराज्यातील व्यावसायिकांनी याठिकाणी चढ्या दराने बकऱ्यांची खरेदी सुरू केल्याने वाढीव दराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील व्यावसायिकांनी परराज्यातील व्यावसायिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चांगला दर मिळत असल्याने पशूमालकांनीही परराज्यातील व्यावसायिकांची बाजू घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com