दीड लाखांचे सापडलेले दागिने तरुणींनी मुळ मालकाला केले सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

आई वडील, शिक्षकांच्या प्रामाणिकपणाच्या शिकवणीने त्यांच्या मनावर मोहाचा ओरखडाही उमटला नाही. उपसरपंचांच्या मदतीने मुळ मालकाचा शोध घेवून त्यांनी सर्व ऐवज त्यांना परत केला. 

आश्वी - घरची परिस्थिती यथातथाच... कष्ट करणाऱ्या आई वडीलांना हातभार लावून जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींना रस्त्याच्या कडेला बेवारस जुनाट कापडी गाठोडे सापडले. उचकून पाहताना त्यांचे डोळे चकाकले... चांदीचे दोन बाजूबंद, दोन छल्ले, सोन्याची बोरमाळ, कर्णफुले, तीन मंगळसूत्र पाहून त्या हबकल्या. मात्र आई वडील, शिक्षकांच्या प्रामाणिकपणाच्या शिकवणीने त्यांच्या मनावर मोहाचा ओरखडाही उमटला नाही. उपसरपंचांच्या मदतीने मुळ मालकाचा शोध घेवून त्यांनी सर्व ऐवज त्यांना परत केला. 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या हजारवाडी येथील रुपाली व पुनम या चुलत बहिणी बुधवारी दुपारी सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतत होत्या. पानोडी हजारवाडी रस्त्याने चालल्या असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला जुनाट कपड्याचे गाठोडे दिसले. कुतुहलाने ते गाठोडे सोडून पाहिल्यावर त्यात काही सोने व चांदीचे दागिने आढळून आले. आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही, त्यांना सुमारे दीड लाख रुपयांच्या या दागिन्यांचा मोह पडला नाही. त्यांनी स्वतःच्या घरी न जाता थेट पानोडीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य गणपत हजारे यांचे घर गाठले. त्यांना सापडलेल्या गाठोड्याची सर्व हकीकत सांगितली. सापडलेल्या वस्तूंची पाहाणी करताना त्यात डिग्रस येथील लक्ष्मण लावरे यांचे नाव असलेला एक कागद सापडला. त्यांना बोलावून घेवून व सापडलेल्या दागिन्यांची ओळख पटवून, खात्री झाल्याने, गणपत हजारे यांनी रुपाली व पुनम यांच्या हस्ते दागिने मुळ मालकाला सुपूर्द केले. 
ही घटना कर्णोपकर्णी परिसरात पसरल्याने हजारवाडीचे ग्रामस्थ, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकांनी या प्रामाणिकपणाचा आदर्श जपलेल्या विद्यार्थीनींचे कौतुक केले आहे.

Web Title: Jewelery worth One and half lakhs handed over to the owner at aashwi sangamner