पालकमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टवर भाजपचा डोळा

BJP
BJP

सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍टमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लक्ष घातले आहे.

येत्या वर्षभरात या प्रकल्पाचे पाणी माण तालुक्‍यातील ३२ गावांना देण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. शिवसेना व भाजपच्या नेत्यांनीच जोर लावल्याने इतकी वर्षे रखडलेला हा प्रकल्प या निमित्ताने तरी मार्गी लागेल, अशी आशा दुष्काळी जनतेला लागली आहे.

जिहे-कठापूर योजनेला १९९५-९६ मध्ये मूळ प्रशाकीय मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची किंमत २६९.०७ कोटी होती. त्यानंतर २०१०-११ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची किंमत ९८०.०७ कोटी झाली. आता या प्रकल्पाची किंमत ८३७.९० कोटी रुपये झाली आहे.

आतापर्यंत या सिंचन योजनेवर ५५६ कोटी रुपये खर्च झालेत. कृष्णा नदीतील ३.१७ अब्ज घनफूट पाणी तीन टप्प्यात उचलून दुष्काळी खटाव तालुक्‍यांतील ११ हजार ७००, तर माण तालुक्‍यातील १५ हजार ८०० हेक्‍टर असे एकूण २७ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रात सिंचन करण्यात येणार आहे. या योजनेचे काम २०१० पासून रखडलेले आहे. वर्धनगड बोगद्याचे काम पूर्ण झाले असून आंधळी बोगद्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात आंधळी तलावात पाणी येण्याची शक्‍यता आहे. 

या योजनेचे पाणी आंधळी धरणातून उचलून उत्तर माणमधील ३५ गावांना देण्यासाठी लागणाऱ्या जॅकवेलचे सर्वेक्षण आणि बोअरिंगच्या कामाचे भूमिपूजन खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. २०१४ मध्ये राज्यातील सत्तेत बदल होऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे झाले. त्यावेळी त्यांनी जिहे-कठापूर योजना हा माझा ड्रीम प्रोजेक्‍ट असून एक वर्षात ही योजना पूर्ण करून माण तालुक्‍यात पाणी नेण्याचे आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खटाव तालुक्‍यातील गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव जिहे-कठापूर योजनेला देण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही या नामकरणावरून सेना-भाजपच्या नेत्यांत वाद पेटला होता. अखेर भाजपच्या नेत्यांनी या योजनेला मोदींच्या गुरूंचे नाव दिले. पण, त्यावेळेपासून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ड्रीम प्रोजेक्‍टवर दुर्लक्ष केल्याचे जाणवू लागले. आता रणजितसिंह यांनी एक वर्षात जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणात आणणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आजपर्यंत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींसह माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आमदार जयकुमार गोरे यांनीही प्रयत्न केले आहेत. आता भाजपच्या खासदारांनी पुढाकार घेतल्याने या योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नीरा-देवघरचा पाण्याचा प्रश्‍न १२ दिवसांत सोडविणारे रणजितसिंह हे जिहे-कठापूरचे कामही तितक्‍याच तत्परतेने पूर्ण करतील, अशी आशा दुष्काळी जनतेला वाटू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com