"राष्ट्रवादी'ला जितेंद्र पवारांचे आव्हान 

सुहास शिंदे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुसेसावळी - जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी बंडखोरीचे निशाण उभारून पक्षापुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे. 

पुसेसावळी - जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी बंडखोरीचे निशाण उभारून पक्षापुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे. 

पुसेसावळी गटात "राष्ट्रवादी'ने माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची पत्नी इंदिरा घार्गे यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. त्यांच्याबरोबर पुसेसावळी येथील चंद्रकांत पाटील यांच्या घरातील उमेदवार देऊन पुसेसावळी गणात मोठ्या गावास प्राधान्य दिलेले आहे. त्या उलट म्हासुर्णे गणामध्ये वडगावच्या रेखा घार्गे यांना उमेदवारी देत म्हासुर्णे या जास्त मतदान असणाऱ्या गावाची नाराजी ओढावून घेतलेली आहे. मात्र, "राष्ट्रवादी'चे नेते, पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. पवार यांच्या गटातील कोणालाच यावेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना डावलल्याचा राग सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहिला आहे. त्याबरोबर श्री. पवार यांचा "राष्ट्रवादी'चा जुना गट यावेळी चांगलाच सक्रिय होऊन त्यांच्यामागे ठाम उभा राहिला आहे. पवार यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत तिन्ही जागांवर उमेदवारी अर्ज भरून "राष्ट्रवादी'समोर डोकेदुखी वाढवली आहे. सध्या श्री. पवार यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांच्याबद्दल पुसेसावळी परिसरात मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांच्या गटाच्या मोठ्या बैठका पार पडत असून, त्यांना भाजपअंतर्गत पाठिंबा मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. दुसरीकडे "राष्ट्रवादी'च्या अर्ज भरलेल्या उमेदवारांनी खासगी भेटीगाठीला प्राधान्य दिले असून, पवारांच्या भूमिकेकडे कानाडोळा करत एक प्रकारे त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. 
जवळपास 40 हजार मतदार असणाऱ्या पुसेसावळी गटामध्ये यावेळी "राष्ट्रवादी'ने पुसेसावळी, पळशी, वडगाव या पाच किलोमीटरमधील गावांचा विचार केल्याने गटातील अन्य गावांची नाराजी वाढली आहे. याचा फटका "राष्ट्रवादी'च्या उमेदवारांना बसण्याची शक्‍यता सर्वसामान्य मतदारांमधून वर्तवली जात आहे. 

शेखर गोरे, गायत्रीदेवींचे सहकार्य कोणाला? 

पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये नव्याने समावेश झालेल्या 12 गावांची भूमिका यावेळी महत्त्वपूर्ण मानली जात असून, त्यामधे शेखर गोरे यांचा गट व गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा गट कोणाला सहकार्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Web Title: Jitendra Pawar to challenge NCP