नोकरीचे आमिषाने कोटींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याच्या टोळीतील पाच जणांवर राजारामपुरी पोलिसांत 1 कोटी 4 लाखांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. आरोग्य खात्यात शिपाई लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांनी गंडा घातला. याबाबतची फिर्याद बाबूराव भिकाजी पाटील (वय 47, रा. उदगाव, ता. शिरोळ) यांनी दिली. 

कोल्हापूर - शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याच्या टोळीतील पाच जणांवर राजारामपुरी पोलिसांत 1 कोटी 4 लाखांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. आरोग्य खात्यात शिपाई लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांनी गंडा घातला. याबाबतची फिर्याद बाबूराव भिकाजी पाटील (वय 47, रा. उदगाव, ता. शिरोळ) यांनी दिली. 

विजय चव्हाण (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा), अधिकराव ऊर्फ भोला पाटील, बजरंग सुतार (दोघे. रा. ऐतवडे, जिल्हा सांगली), हेमंत पाटील (रा. येडे मच्छिंद्र, ता. वाळवा), सचिन हंबीरराव पाटील ऊर्फ गोयल साहेब (रा. वाटेगाव, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती, बाबूराव पाटील उदगाव येथे राहतात. त्यांना श्रीनाथ व अभिजित मुले आहेत. ते प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. मे 2018 ला ते शिरोळ तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त गेले होते. तेथे विजय चव्हाणही आला होता. त्यावेळी त्या दोघांची ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत त्याने पाटील यांना आरोग्य खात्यातील सचिव गोयल साहेबांची ओळख आहे. ते बेरोजगार मुलांना नोकरी लावतात. सध्या आरोग्य खात्यात लिपिक व शिपाई पदाची भरती सुरू आहे. त्यासाठी दोन टप्प्यात पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्या आमिषाला बळी पडून बाबूराव पाटील व त्यांचा मित्र परिवार बळी पडला. 

लिपिकला सात तर शिपाई पदासाठी पाच लाख 
विजय चव्हाणच्या टोळीने लिपिक पदासाठी सात तर शिपाई पदासाठी पाच लाखांची मागणी केली. ऑर्डर दिल्यानंतर निम्मी आणि नोकरीला रुजू झाल्यावर राहिलेली अशी दोन टप्प्यात रक्कम द्या, असे सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडून बाबूराव पाटील व त्यांच्या मित्रांनी मुलांच्या नोकरीसाठी विजय चव्हाण, अधिकराव ऊर्फ भोला, बजरंग सुतार, हेमंत पाटील आणि सचिन पाटील या पाच जणांना 25 मे ते 17 ऑगस्ट 2018 अखेर तब्बल 1 कोटी 4 लाख रुपये दिले. त्या बदल्यात त्या सर्वांना भामट्यांनी शासकीय राजमुद्रेचा गैरवापर करून बनावट नियुक्तीपत्रे दिली. मात्र या भामट्याच्या टोळीला काही दिवसांपूर्वी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपली भामट्यांनी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्व मित्रपरिवारांच्या वतीने याबाबत राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. 

गोयल साहेबांचा रुबाब... 
आरोग्य खात्यातील सचिव अर्थात गोयल साहेब म्हणून उभा करण्यात आलेला संशयित सचिन पाटील याचा साहेबी रुबाब असायचा. लोणावळा येथे फिर्यादी बाबूराव पाटील व त्यांच्या मित्रांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी हा गोयल साहेब हा मोठ्या हॉटेलमध्ये लाल दिव्याच्या आलिशान गाडीतून सुटाबुटात आला. त्याच्या सोबतीला चार-पाच सुरक्षारक्षही होते. त्यामुळे तो खराखुराच सचिव गोयल साहेब, असा सर्वांचा समज झाला.

Web Title: Job loyalty fraud case in kolhapur