या शहरात होणार अनोखी शिवजयंती, अठरापगड जातीचे मावळ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीतील दुचाकी रॅलीत सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे नगर जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले आहे. 

नगर - छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जातीचे अथवा धर्माचे नाहीत. त्यांनी बहुजनांसाठी कार्य केले. रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मिरवणुकीतील दुचाकी रॅलीत सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे नगर जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले आहे. 

इथापे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे मराठा सेवा संघ कोण्या एका जातीचे नाही तर मराठा या समूहाचे आहे. मराठा समुहात अठरा पगड जाती येतात. शिवाजी महाराज यांनी कोणत्याही धर्माला हीन वागणूक अथवा दुषणे दिलेली नाहीत. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती, धर्माच्या लोकांना उच्चपदे देण्यात आली होती. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते.

19 फेब्रुवारीला त्यांच्या राज्याची जयंती मिरवणूक निघणार आहे. या जयंती मिरवणुकीत सर्व जाती, धर्मातील लोकांनी सहकुटूंब सहभागी व्हावे. शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी राजे, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, गाडगे महाराज अशा महापुरूषांची वेषभूषा करून जयंती मिरवणुकीतील दुचाकी रॅलीत सहभाग घ्यावा. 

हेही वाचा - लष्कराच्या केके रेंजवर या कारणाने गेला शेकडोंचा बळी! 

अशी निघणार दुचाकी रॅली 
नगरमध्ये सकाळी 9 वाजता जयंती मिरवणूक कार्यक्रमातील दुचाकी रॅली सुरू होईल. यात पुढे रथ राहील. या रथाच्या माध्यमातून ध्वनी क्षेपक व बॅनरमधून सामाजिक संदेश देण्यात येतील. त्यामागे सहभागी लोक दुचाकी रॅली काढतील. ही रॅली माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघेल. मार्केट यार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवाडा वेशीतील महात्मा ज्योतीबा फुले पुतळा, जुनी वसंत टॉकीज, बंगाल चौकी, धरती चौक, हातमपुरा, रामचंद्रखुंट, दाळमंडई, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, निलक्रांती चौक, बालिकाश्रम रस्ता, भुतकरवाडी, फुलारी पेट्रोल पंप, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम रस्ता, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रस्ता, एकविरा चौक, श्रीराम चौक, शिलाविहार, गुलमोहर रस्ता पोलिस चौकी, कलानगर, जॉगिंग पार्क, मिस्कीनमळा, तारकपूर, पत्रकार चौक, लालटाकी मार्गे चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Join all caste religions in Shiv Jayanti