सांगलीकरहो, पक्षी वाचवा मोहिमेत सहभागी व्हा 

सांगलीकरहो, पक्षी वाचवा मोहिमेत सहभागी व्हा 

सांगली - आपल्या शहराला शंभरावर विविध पक्ष्यांच्या जातींनी वैभवच प्राप्त करून दिले आहे. मात्र, वाढत्या विस्तारात पक्ष्यांचे जीवन विस्कळित झाले आहे, असे वाटत नाही का? मग, आपल्या शहरातलं हे पक्षिवैभव जपण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. म्हणूनच पक्षी संवर्धनासाठी "सकाळ माध्यम समूह', शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महापालिका, वन विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे "चला, पक्षी वाचवूया' हा संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात साऱ्या सांगलीकर नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे. येथील शास्त्री उद्यानात सोमवारी (ता. 20) सकाळी साडेदहा वाजता मोहिमेला प्रारंभ होईल. त्याच दिवशी जागतिक चिमणी दिनानिमित्ताने पक्षी पुनर्वसन केंद्राचे उद्‌घाटनही होईल. विविध शाळांतील हरित सेनेचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. 

शहरातील विविध उद्यानांत झाडांवर प्रजनन होणाऱ्या पक्ष्यांपैकी अनेक जखमी पक्ष्यांचे प्राणिमित्रांकडून संगोपन केले जाते. दरवर्षी पाचशेवर पक्ष्यांना जीवदान दिले जाते. यंदा अधिक पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी व्यापक मोहीम साऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून मोहिमेची जनजागृती सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या सहकार्याने मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. 

नियोजनासंदर्भात आज बैठक झाली. त्यात "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ऍग्रोवनचे व्यवस्थापक शीतल मासाळ, इव्हेंट विभागाचे परितोष भस्मे, वितरण विभागाचे रवींद्र बिरंजे यांच्यासह नगरसेवक शेखर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. शास्त्री उद्यानात जखमी पक्ष्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावाही घेण्यात आला. तसेच शहरात प्रबोधनात्मक फलकही ठिकठिकाणी उभारण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. शहरात ठिकठिकाणी फलक लावण्याची जबाबदारी नगरसेवक शेखर माने यांनी घेतली. तर औषधोपचारासाठी लागणारी वैद्यकीय सुविधा "वेलनेस'चे सम्राट माने यांनी देण्याचे मान्य केले. 

ऍनिमल सहाराचे अजित काशीद, पुष्पा काशीद, खोप बर्ड हाउसचे सचिन शिंगारे, सुनीता शिंगारे, ऍनिमल राहतचे अधिकारी शशिकर भारद्वाज, किरण नाईक, इन्साफचे मुस्तफा मुजावर, बर्ड सॉग्स्‌चे संजय पोंक्षे, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपचे प्रा. शशिकांत ऐनापुरे, रॉयल्स यूथ स्टुडंट फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषीकेश पाटील, इम्तिबाज शेख, गोविंद सरदेसाई, दिलीप शिंगाणा, नवनाथ लाड उपस्थित होते. 

नागरिकहो.. आपण हे करा 
पक्ष्यांची तहान भागवावी, यासाठी संवेदनशील व्यक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. अनेक जण आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत, बंगल्याच्या छतावर किंवा अंगणात पाणी ठेवण्याची व्यवस्था करतात. काही जण नियमित खाद्यपदार्थही ठेवतात. तुम्हीही असाच प्रयत्न करून पाहा किंवा काहींनी केलाही असेल. तुमच्या वेगळ्या प्रयत्नांची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. यासंबंधीचे काही फोटो असतील तर तेही नक्कीच पाठवा. वेगळ्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाईल. संपर्क ः व्हॉटस्‌ऍप (9146095500) किंवा sansakal@gmail.com या संकेतस्थळावर मेल करा. 

शहरातील पाच उद्यानांत बसणार कृत्रिम घरटी 
शहरातील पाच विविध उद्यानांत कृत्रिम घरटी उभी करण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या आवाहनाला "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अनिक मडके यांनी सकारात्मकता दाखवली. त्यानुसार शहरातील तीस डॉक्‍टर पुढे आले असून त्यांनी कृत्रिम घरटी देण्याचे मान्य केले आहे. त्यात शास्त्री उद्यान, प्रतापसिंह उद्यान, आमराई, सानेगुरुजी उद्यान, महावीर उद्यानाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com