जोतिबा डोंगरावर पहिल्या पाकाळणीला दीड लाख भाविक 

निवास मोटे
रविवार, 21 एप्रिल 2019

एक नजर

  • जोतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे आज पाकळ्णीचा पहिला रविवार उत्साहात
  • महाराष्ट्र ,कर्नाटकातील दीड लाखाच्यावर भाविकांनी डोंगरावर हजेरी
  • माण, खटाव, सातारा, सांगली, इचलकरंजी, बेळगाव या भागातील सासनकाठ्या सकाळी मंदिरात दाखल
  • पाडळी ( सातारा ) सासनकाठी दर्शनासाठी गर्दी

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं., येमाईदेवी,चोपडाईदेवी, नंदी..महादेव, काळभैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी (जोतिबा डोंगर)येथे आज पाकळ्णीचा पहिला रविवार उत्साहात झाला. महाराष्ट्र ,कर्नाटकातील दीड लाखाच्यावर भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली.

काही अडचणीमुळे जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी ज्या सासनकाठ्या आल्या नाहीत, त्या सासनकाठ्या आज डोंगरावर दाखल झाल्या. हलगी, पिपाणी, सनई ढोल, ताशे यांच्या तालावर या सासनकाठ्या नाचविण्यात आल्या. त्यामुळे डोंगर परिसर आजही दणाणून गेला.

आज पाकळणीचा पहिला रविवार असल्यामुळे पहाटेपासूनच भाविक डोंगरावरही येऊ लागले. त्यामुळे दिवसभर डोंगरावर गर्दी राहिली .भाविकांच्या झुंडी दिवसभर डोंगरावर येतच होत्या.

आज सकाळी श्री जोतिबा देवाची सालंकृत महापूजा बांधण्यात आली.  त्यानंतर दुपारी बारा वाजता धुपारतीचा सोहळा झाला. यावेळी भाविकांनी उंट, घोडे व मंदिर शिखरावर गुलालाची उधळण करण्यासाठी गर्दी केली. आज डोंगरावर सकाळी माण, खटाव, सातारा, सांगली, इचलकरंजी, बेळगाव या भागातील सासनकाठ्या सकाळी मंदिरात दाखल झाल्या. त्यांनी मंदिर परिसरात सासनकाठयांची मिरवणूक काढली. दुपारीभर उन्हात भाविकांनी सासनकाठी नाचवण्याचा आनंद घेतला. आज रात्री मंदिर परिसरात भव्य दिव्य असा पालखी सोहळा झाला.

पाडळी ( सातारा ) सासनकाठी दर्शनासाठी गर्दी
जोतिबा मंदिरात आज रात्री पालखी सोहळा झाल्यानंतर पाडळीच्या मानाच्या सासनकाठीचे दर्शन घेण्यासाठी जोतिबा ग्रामस्थ पुजारी यांनी गर्दी केली. तसेच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण तसेच नारळाची तोडणे बांधण्यासाठी गर्दी केली. 

Web Title: Jotiba Dongar Chaitra Yatra Half a million devotees