‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबरे, विविधरंगी फुले यांची उधळण करत आज सकाळी जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा झाला. ‘चांगभलं’च्या गजरात मुख्य मंदिराभोवती पालखीच्या प्रदक्षिणा झाल्या.

जोतिबा डोंगर - ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबरे, विविधरंगी फुले यांची उधळण करत आज सकाळी जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा झाला. ‘चांगभलं’च्या गजरात मुख्य मंदिराभोवती पालखीच्या प्रदक्षिणा झाल्या. 

या सोहळ्यासाठी आज राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. आजपासून दर रविवारी व पौर्णिमेला रात्री साडेआठला पालखी सोहळा होईल. आज खंडेनवमीनिमित्त जोतिबा देवाची श्रीकृष्ण रूपातील अंलकारिक महापूजा बांधली. सकाळी मंदिरात पालखी सोहळ्यानंतर मधू महालदार यांनी वैशिष्ट्यपूर्ण हाळी दिल्यानंतर पालखी मंदिरात गेली. पालखी सोहळ्यासाठी देवस्थानचे अधीक्षक महादेव दिंडे, सरपंच राधा बुणे, देवस्थानचे सचिव विजय पोवार, तहसीलदार रमेश शेंडगे  आदी उपस्थित होते.

डोंगरावर आज पहाटे चार ते सहा या वेळेत दिवे ओवाळणी सोहळा झाला. गावातील सर्व महिला नटूनथटून सर्व मंदिरांत दिवे ओवाळणीसाठी आल्या, त्यामुळे सर्व मंदिरे पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. उद्या (ता. ८) विजयादशमीनिमित्त ‘श्रीं’ची अंबारीतील वैशिष्ट्यपूर्ण अशी पूजा बांधली जाईल. सायंकाळी साडेपाचला दक्षिण दरवाजा येथे पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन कार्यक्रम होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jotiba Palkhi Sohala