रेशनिंगवरही आता ज्वारी अन्‌ मका!

हेमंत पवार
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड - शासनाने हमीभावाने ज्वारी आणि मक्‍याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. ती ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जास्त काळ ठेवून ती खराब होवून वाया जाणार याचा विचार करून शासनाने आता रेशनिंगवर ज्वारी आणि मका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी गव्हाचे प्रमाण कमी करण्यात येणार असून, त्याऐवजी संबंधित दोन वस्तू देण्यात येणार आहेत. पुढील नोव्हेंबर महिन्यापासून त्याचे वाटप सुरू होणार आहे.  

रेशनिंगवर सध्या गहू, साखर, तुरडाळ आदी वस्तू दिल्या जात आहेत. त्याचबरोबर अन्य काही वस्तूही देण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता केंद्र शासनाच्या धोरणानुसार विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत राज्यातील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या भरडधान्याचे राज्यातच वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्याठिकाणी ज्वारी व मका खरेदी करण्यात येणार आहे, तेथे संबंधित वस्तूंचे रेशनिंगवर वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना त्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी व मका देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी त्याचे नियोजन करणार आहेत. ज्वारी आणि मका हा लवकर खराब होतो, असे गृहीत धरून ज्या महिन्यात ज्वारी आणि मका खरेदी केला जाईल, शक्‍यतो त्याच महिन्यात त्याचे वाटप व्हावे यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिस्तभंगाची कारवाई     
ज्या जिल्ह्यामध्ये मका आणि ज्वारीची खरेदी केली जाईल, त्या जिल्ह्यात प्राधान्याने रेशनिंगवर त्याचे वाटप करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात येणार आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यात तत्काळ वाटपाची कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाचीही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

Web Title: Jowar and Maize available in Ration Shop