" कडकनाथ ' कोंबड्यांचं करायचं तरी काय..? ; व्यावसायिकांपुढे पेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

भुलभुलैय्यात अडकून अनेकजण फसले आहेत. सध्या कोंबड्यांचे करायचे तरी काय, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. आता अधिक दिरंगाई सहन होणारी नाही. त्यामुळे तातडीने याप्रश्नी निर्णय होऊन व्यावसायिकांना दिलासा मिळावा. 
- रामभाऊ डुबल, नुकसानग्रस्त व्यावसायिक 

ढेबेवाडी ः कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या व्यावसायिकांपुढे आता त्यांच्या फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात पडून असलेल्या कोंबड्यांचे करायचे काय आणि त्यांना जगवायचे कसे, असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अनेकजण ठिकठिकाणच्या आठवडा बाजारात कोंबड्या विक्रीसाठी घेऊन जात असले तरी या कोंबड्यांना अपेक्षित उठाव दिसत नाही. अनेकांनी कोंबड्यांवरील खाद्य व औषधांच्या खर्चातही हात आखडता घेतल्याचेही दिसत आहे. 

सध्या गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्‍यातीलही शंभरहून अधिक व्यावसायिकांचा समावेश आहे. पाटण पोलिसात या प्रकरणी 99 तक्रारी दाखल असून, अजूनही काही जणांनी तक्रारी न दिल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत. एकट्या ढेबेवाडी भागातील तीसहून अधिकजण कडकनाथच्या भुलभुलैय्यात अडकले असून, फसलो गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संबंधित कुटुंबे खूपच अस्वस्थ आहेत. काहींनी बॅंका, पतसंस्था व महामंडळाची कर्जे घेऊन, तर काहींनी सोने-जमीन गहाण ठेऊन आणि उसनवाऱ्या करून या व्यवसायात आजमवलेल्या नशिबाने त्यांना दगा दिला आहे. काही व्यावसायिकांनी भाड्याने शेड घेऊन तर काहींनी नवीन शेड उभारून पाळलेल्या या कोंबड्यांसह मोठ्या प्रमाणात पडून असलेल्या त्यांच्या अंड्यांचे आता करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

चौकशीचा फेरा संपून कधी नुकसानीतून सुटका होईल, या विवंचनेत पडलेल्या कडकनाथ व्यावसायिकांनी दररोजची देखभाल, खाद्य, मजूर व औषधांचा खर्च या सर्व बाबींना कंटाळून आता परिसरातील आठवडा बाजार आणि गावागावांत कोंबड्या भरलेली खुराडी विक्रीसाठी पाठवायला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी आठशे-नऊशे रुपये दराने विक्री होणारी कडकनाथ कोंबडी आता अडीचशे -तीनशेलाही मिळत आहे. या कोंबडीतील औषधी गुणधर्म सांगून विक्रेत्यांकडून त्यांची विक्री सुरू असून, अशाच पद्धतीने शिल्लक अंड्यांचीही विल्हेवाट लावली जात आहे.

सोशल मीडियावरूनही सध्या कडकनाथच्या खरेदीसाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. शंभर कोंबड्यांमागे दररोज 500 रुपये देखभाल खर्च येत आहे. घातलेले पैसे परत येतील की नाही, अशीच सध्याची परिस्थिती असल्याने अनेकांनी खाद्य व औषधांवरील खर्च कमी केला असून, त्याचा परिणाम कोंबड्यांच्या वजनावर झाला आहे. त्यातूनच कोंबड्या मृत होण्याचे प्रमाणही वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Kadaknath" chickens professionals in trouble