कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरण : पुण्यातील तिघांचा सहभाग असल्याचे उघड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

इस्लामपूर - येथील रयत अॅग्रो. प्रा. लि. या कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. पोलीसांनी बुधवारी दोन संचालकांच्या गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पुण्याच्या आणखी तिघांना सहआरोपी करण्यात आले. तर संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत शनिवार (ता. 14) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

इस्लामपूर - येथील रयत अॅग्रो. प्रा. लि. या कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता गती आली आहे. पोलीसांनी बुधवारी दोन संचालकांच्या गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पुण्याच्या आणखी तिघांना सहआरोपी करण्यात आले. तर संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत शनिवार (ता. 14) पर्यंत वाढ केली आहे. 

मृगेश कदम, रोहित पुराणिक, सुधीर कापरे (सर्व रा. पुणे) यांचा या फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी संदीप मोहिते याची 7 लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची एक्‍सयुव्ही 500 ही चारचाकी गाडी (क्र. एम.एच.10 सी.बी. 1015) जप्त केली तर संचालक विजय शेंडे याची टाटा नेक्‍सोन कंपनीची चारचाकी गाडी (क्र. एम.एच.10 सी.एक्‍स.4451) गाडी ताब्यात घेतली आहे. 

फसवणूकीचा प्रकार चर्चेत आल्यापासून सूधीर मोहिते व गणेश शेवाळे बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी एका अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला . मात्र त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास इस्लामपूर पोलिसांकडून अर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान मोहिते याने केलेल्या फसवणुकीचा आकडा कोट्यावधी रुपयांवर गेला आहे. रयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचा संचालक संदीप मोहिते आणि हणमंत जगदाळे या दोघांना अटक केली आहे. सुधीर मोहिते याने महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड राज्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. या कंपनीच्या विरोधात कोल्हापूर, इस्लामपूर, पुणे आणि पाटण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुधीर मोहिते व गणेश शेवाळे याने ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी शुक्रवारी (ता.13)होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील हणमंत जगदाळे याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संदीप मोहितेच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले त्याच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath hen fraud case follow up