'कडकनाथ' घोटाळा प्रकरणात सदाभाऊंनी 'याचा' खुलासा करावा

'कडकनाथ' घोटाळा प्रकरणात सदाभाऊंनी 'याचा' खुलासा करावा

इस्लामपूर - कडकनाथ प्रकरणी झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आव्हान प्रहार संघटनेच्यावतीने आज येथे स्वप्निल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर करणाऱ्या सदाभाऊंनी यांनी पोलिसांना जी चारचाकी गाडी हाती लागली आहे, तिच्यावर असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या लोगोचा खुलासा करावा, अशीही मागणी केली आहे.  

रविवारी (ता. १५) सदाभाऊंच्या बंगल्यावर 'मुक्काम मोर्चा' काढणार असून यात महाराष्ट्र व राज्याबाहेरील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज येथे येऊन २७७ शेतकऱ्यांची सुमारे २ कोटी ६७ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. महेश दुर्ग पाटील (रा. यळेबेल, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली. बेळगाव जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना तक्रारींचे निवेदन दिले.

श्री. पाटील म्हणाले, "कडकनाथ घोटाळ्याची व्याप्ती पाच ते सहा राज्यात आहे. आसूड मोर्च्याच्यावेळी १० कोटी रुपये फसवणुकीच्या ५५० तक्रारी होत्या. आता हा आकडा २० कोटींवर पोचला आहे. आणखी तक्रारी येतच आहेत. याविरोधात राज्यभर अनेक संघटना रस्त्यावर येत असताना कृषिराज्यमंत्री मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीयेत. पोलीस गंभीरपणे तपास करत नाहीयेत. पोलीस आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. एमपीआयडीअंतर्गतच गुन्हे दाखल करून घ्यावेत.

मोहितेला कुणाचा आश्रय आहे हे स्पष्ट आहे. पाटण येथे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हेगाराचा जो साक्षीदार झालाय यातही गोलमाल आहे. यात संबंधित पोलीस अधिकारी, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जावेत, अशी आमची मागणी आहे, असेही श्री पाटील म्हणाले.

रविवारच्या मोर्च्यावेळी 'खून ले लो, मगर जान मत ले लो' म्हणत शेकडो शेतकरी रक्तदान करून निषेध व्यक्त करणार आहेत. सदभाऊंनी प्रामाणिकपणे यादिवशी उपस्थित राहावे. त्यांच्या आरोपांची, प्रश्नांची उत्तरे देऊ. १६ तारखेला मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येताहेत, त्यांनाही मागण्यांचे निवेदन देणार आहोत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश देऊन न्याय मिळवून द्यावा."

बेळगावचे शेतकरी नीलेश मोरे, राकेश माळवदे म्हणाले, "फसवणूक झालेले शेतकरी महाराष्ट्र किंवा कर्नाटक राज्यातील असले तरी सरकार व पोलिसांनी सर्वांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी. या तपासात कर्नाटकच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत दुजाभाव होऊ देऊ नये. कडकनाथ कोंबडी पक्षांची आणि झालेल्या नुकसानीची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. बेळगाव जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील सुमारे ३५० हुन शेतकरी अद्याप एकत्र येताहेत, तेही तक्रारी दाखल करतील." महेश पाटील, श्रीराम नांगरे-पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com