टेक्‍स्टाईल उद्योजक रोजंदारीवर 

टेक्‍स्टाईल उद्योजक रोजंदारीवर 

कडेगाव -  राज्य शासनाकडून टेक्‍स्टाईल पार्कसाठी असलेली 35 टक्के प्रोत्साहनपर सामूहिक अनुदान योजना बंद झाली. वाढते वीज दर, सूत उद्योगातील मंदी, नोटाबंदी, जीएसटी आदी कारणांमुळे येथे टेक्‍स्टाईल पार्कमधील यंत्रमाग उद्योग पूर्णतः बंद पडण्याचा धोका आहे. पर्यायाने 250 एकरांतील टेक्‍स्टाईल पार्कही बंद होण्याची भीती आहे. दीडशे उद्योगांचे अंदाजे 100 कोटींवर कर्ज थकीत आहे. 60 टक्के युनिट बंद आहेत. थकबाकीपोटी 20 टक्के युनिट बॅंकांनी सील केली तर केवळ 20 टक्के युनिट कशीबशी सुरू आहेत. दीडशेपैकी अनेकजण रोजंदारीच्या कामावर असल्याची भयावह स्थिती आहे. 

तत्कालीन उद्योगमंत्री पतंगराव कदम यांनी कडेगाव तालुक्‍याच्या विकासासाठी व्हिव्हर्स पार्कची घोषणा केली. गुहागर-विजापूर मार्गावर 250 एकर जागेवर टेक्‍स्टाईल पार्क उभारले. सुशिक्षित व बेरोजगारांनी छोटी-मोठी यंत्रमाग उद्योगाची युनिट सुरू केली. बॅंकांची कर्जे व आयुष्याची पुंजी खर्च करून 175 कोटींची गुंतवणूक केली. यंत्रमाग युनिट उभारली. कडेगावसह तालुक्‍यातील बेराजगारांना रोजगार मिळाला. चांगल्या दर्जाच्या कापडाचेही उत्पादन सुरू झाले. उद्योजक बनण्याचे गरीब तरुणांचे स्वप्न प्रत्यक्षातही झाले. टेक्‍स्टाईल पार्कमुळे कडेगावची "मिनी मॅंचेस्टर' अशी ओळख निर्माण होऊ लागली. मात्र पुढे घडी विस्कटत गेली. विजेचे वाढते दर, कर्जे, सूत उद्योगातील मंदी आदी तांत्रिक व त्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांनी सामूहिक अनुदान योजना बंद केली. त्याचा परिणाम म्हणून टेक्‍स्टाईल पार्कला घरघर लागली. 

उद्योजक मोठ्या आर्थिक बोजाखाली जाऊन संकटात सापडले. गुंतवणुकीच्या प्रमाणात मोबदला मिळेना. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. अनेक वर्षे पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून सवलती व अनुदान मिळाले नाही. आता तर 60 टक्के युनिट बंद आहेत. 20 टक्के युनिटना थकबाकीमुळे बॅंकांनी टाळे ठोकली. 20 टक्के कशीबशी सुरू आहेत; पण ती घटका मोजत आहेत. येथे सुमारे 100 कोटींचे कर्ज थकीत आहे. बॅंकांचा वसुलीसाठी ससेमिरा आहे. पैसे नसल्याने अनेकजण सैरभैर आहेत. कर्जबाजारी उद्योजकांवर मजुरीसह किरकोळ काम, हंगामी व्यवसाय करण्याची वेळ आली. काहींनी कांदे-बटाटे विक्रीचाही व्यवसाय सुरू केला आहे. या तणावामुळे काहीजण मधुमेह, अर्धांगवायू, हृदयविकार व मानसिक नैराश्‍य आदी आजारांचे शिकार बनले. दोन हजारांवर कामगार बेरोजगार झाले. सरकारने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आहे. 

विविध योजना व सवलती मिळाव्यात, यासाठी उद्योजक शिष्टमंडळामार्फत शासनाकडे पाठपुरावा करीत आहे; परंतु अजून काहीच निर्णय झालेला नाही. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्हिव्हर्स पार्कमधील यंत्रमागधारकांसाठी सामूहिक प्रोत्साहनपर योजना पुन्हा सुरू करावी. बॅंकांच्या ताब्यात असलेले यंत्रमाग उद्योग संबंधित उद्योजकांच्या ताब्यात द्यावेत. त्यांना एकरकमी कर्जफेड शक्‍य नाही. कर्जाचे हप्ते बांधून द्यावेत. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या अडचणीत येतात; तेव्हा विशेष पॅकेज दिले जाते. त्याच धर्तीवर यंत्रमाग उद्योगांनाही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पॅकेज द्यावे. लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे; अन्यथा व्हिव्हर्स पार्क आणि उरले सुरले यंत्रमाग उद्योगही बंद पडतील, अशी भीती आहे. 

""यंत्रमाग उद्योगांना विविध योजना व सवलती मिळाव्यात यासाठी उद्योजकांचे शिष्टमंडळ राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे; परंतु आघाडी सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. आता युती सरकारने तरी सकारात्मक निर्णय घ्यावा. लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांनीही लक्ष द्यावे.'' 
-अजय भस्मे, यंत्रमागधारक- उद्योजक. 

कडेगाव टेक्‍स्टाईल पार्कवर नजर 
क्षेत्रफळ....................250 एकर 
उद्योजक....................150 
युनिट.......................150 
बंद युनिट...................60 टक्के 
बॅंकांकडून टाळे...........20 टक्के 
सुरू युनिट...................20 टक्के 
गुंतवणूक..................175 कोटी 
कर्जाची थकबाकी........100 कोटी 
बेरोजगार कामगार........2000 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com